Fri, Nov 24, 2017 20:19होमपेज › Sangli › सीआयडी, सीबीआय नको; न्यायालयीन चौकशी करा

सीआयडी, सीबीआय नको; न्यायालयीन चौकशी करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

अनिकेत कोथळे याचा पोलिस कोठडीतील मृत्यू आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकण्याचा प्रकार भयंकर आहे. याप्रकरणी सीआयडी, सीबीआय चौकशी नको. न्यायालयीन चौकशीची गरज आहे,  अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

पोलिसी अत्याचाराविरोधात मंगळवारी सांगलीत चर्चासत्र झाले. ‘कुंपणच शेत खाते तेव्हा..?’ या विषयावर चर्चेसाठी निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश खोेपडे, अ‍ॅड. वर्षा देशपांडे सांगलीत आले होते.  

सीआयडीकडे यंत्रणा नाही; राजकीय प्रभाव : अ‍ॅड. देशपांडे

अ‍ॅड. देशपांडे म्हणाल्या, अनिकेत कोथळेप्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. ‘सीआयडी’कडे यंत्रणा नाही. सीआयडी, सीबीआयवर राजकीय प्रभाव आहे. त्यामुळे याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली पाहिजे. कोथळेप्रकरणी आरोपींना जामिन मिळता कामा नये. कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. 

महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्री हवा

अ‍ॅड. देशपांडे म्हणाल्या, राज्याचे गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा आहे. पूर्वी आर. आर. आबा गृहमंत्री असताना त्यांना आम्ही कधीही फोन करू शकत होतो. पण आता दोन्हीही मंत्री फोनवर उपलब्ध होत नाहीत. गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशीही फोनवरून संपर्क होत नाही. 

‘फॅक्ट फाईंडींग’ करणार

सांगलीत चर्चासत्रात अ‍ॅड. देशपांडे म्हणाल्या, अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी प्रसंगी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला जाईल. या प्रकरणाची ‘फॅक्ट फाईंडींग’ करून दोषींवर कडक कारवाईसाठी पाठपुरावा केला जाईल. 

आयजी ‘शो मॅन’

आयजींपासून खालपर्यंत सर्वजण ‘शो मॅन’ आहेत. पोलिस दलावर नियंत्रण ठेवण्याऐवजी  ते भाषणबाजी करत फिरत असतात, अशी टीकाही अ‍ॅड. देशपांडे यांनी केली.