Mon, Jun 17, 2019 04:26होमपेज › Sangli › जीपीएस, सीसीटीव्हीने सतर्कता वाढेल

जीपीएस, सीसीटीव्हीने सतर्कता वाढेल

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 02 2018 11:44PMसांगली : प्रतिनिधी

पोलिस दलाकडील वाहनांना जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे. ती कार्यान्वित करण्यात आली आहे. शिवाय सांगली शहरातील प्रमुख चौकात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरेही सुरू करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रणालीमुळे पोलिसांची सतर्कता वाढणार आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवता येणार आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले. 

महाराष्ट्र दिनी पोलिस मुख्यालयात आयोजित जीपीएस आणि सीसीटीव्ही कॅमेरा प्रणालीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यावेळी उपस्थित होते. जिल्हा पोलिस दलाकडील चारचाकी आणि दुचाकी अशा एकूण 88 वाहनांना जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे. यामुळे वाहनाचे निश्‍चित ठिकाण (लोकेशन), वाहनाचा वेग, वाहन थांबवल्यास त्याची माहिती मिळणार आहे. दिलेला मार्ग सोडून वाहन गेल्यास त्याचीही माहिती या प्रणालीमुळे मिळणार आहे. 

गुन्हा घडलेल्या ठिकाणी तातडीने पोहोचण्यासाठी जवळचा मार्गाने वाहन पाठविणे या प्रणालीमुळे शक्य होणार आहे. निर्भया पथकालाही तात्काळ माहिती देऊन जवळचे वाहन घटनास्थळी पाठविणे शक्य होणार आहे. अति महत्वाच्या व्यक्तींच्या दौर्‍यात, परराज्यात गुन्हेगार शोधण्यास गेल्यास वाहनाचे नेमके ठिकाण यामुळे समजू शकणार आहे. त्यामुळे गुन्हा घडल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहचण्यासह अन्यदृष्टीने ही प्रणाली पोलिस दलाला उपयुक्त ठरणार आहे. 

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील महत्वाच्या 31 चौकांमध्ये 70 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीचे नियंत्रण आणि नियमन चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्याशिवाय ट्रिपल सीट, मोर्चा, आंदोलनावेळी लक्ष ठेवणे यामुळे शक्य होणार आहे. त्याशिवाय सिग्नल तोडणारी वाहनेही यामध्ये सापडणार आहेत. जबरी चोरी, चेन स्नॅचिंगसारखे गुन्हे उघडकीस आणण्यास याची मदत होणार आहे. 

पोलिस दलातर्फे या दोन्ही प्रणाली दि. 1 मेपासून कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.