Wed, Jun 26, 2019 17:30होमपेज › Sangli › शासनाच्या आरोग्य योजना तकलादू : जयंत पाटील

शासनाच्या आरोग्य योजना तकलादू : जयंत पाटील

Published On: Feb 04 2018 10:56PM | Last Updated: Feb 04 2018 10:54PMसांगली : प्रतिनिधी

अनेक शासकीय आरोग्यदायी योजना असल्या तरी अनेक आजार त्यांच्या कक्षेत नाहीत. शिवाय त्यांच्या महागड्या उपचारांमुळे गोरगरिबांना मरण पत्करण्याची वेळ येते, अशी खंत राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी व्यक्‍त केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्यावतीने आयोजित महाआरोग्य शिबिर आणि कार्यकर्त्यांनी जपलेले उपचाराचे व्रत हे जीवनदायिनी आहे, असे मत त्यांनी व्यक्‍त केले.
जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी कुपवाड रस्त्यावरील नव महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर  महाआरोग्य शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील, आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, आरोग्य शिबिरे अनेक ठिकाणी होतात. तेथे केवळ तपासणीचा देखावा करण्यात येतो. मात्र उपचाराची जबाबदारी घेतली जात नाही. मात्र 80 टक्के समाजकारण  व 20 टक्के राजकारण हे राष्ट्रवादीचे ध्येय आहे.  त्यानुसार राष्ट्रवादीच्या शिबिरात निदान केल्यानंतर त्यावर आवश्यक ते उपचार पूर्णपणे मोफत होतात.  शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि त्यांचे कार्यकर्ते गेली काही वर्ष अशी शिबिरे आयोजित करून महापालिका क्षेत्रच नव्हे तर आता जिल्ह्याच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. याचा लाभ श्रीमंतांना नव्हे तर प्रामुख्याने गोरगरीब व मध्यमवर्गीयांना होत आहे. 
जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, शहर, मतदारसंघाचा विकास सगळेच करतात. पण, जनतेच्या आरोग्याकडे लक्ष देणेही महत्वाचे आहे. त्यासाठी अशा मोफत शिबिरे आरोग्य सेवा देण्याचा आदर्श आमदार जयंत पाटील आणि संजय बजाज यांच्या टीमने घालून दिला आहे. वाढदिन, जयंतीच्या निमित्ताने उधळपट्टी करण्यापेक्षा हा आदर्श सर्व लोकप्रतिनिधींनी जपणे गरजेचे आहे. 

बजाज म्हणाले, शिबिरासाठी सांगलीपासून मुंबईपर्यंतच्या विविध संस्था, हॉस्पिटल्सचे सहकार्य होत आहे. केवळ निदान करण्यासाठी हे शिबिर नसून नागरिकांना त्यापुढील उपचारासाठीही मार्गदर्शन केले जाते असे सांगितले. युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी आभार मानले. यावेळी महापालिकेचे अधिकारी, राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, विविध संस्था, हॉस्पिटल्सचे डॉक्टर्स उपस्थित होते. 

रविवारी झालेल्या शिबिरात हृदय, नेत्र, कान, नाक, घसा, पोट आणि हाडांच्या विकाराची तपासणी करण्यात आली. तसेच स्त्रियांच्या विकाराची तपासणी करण्यात आली. एक हजारहून अधिक रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तर पंधरा हजारजणांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.