Tue, Mar 26, 2019 11:39होमपेज › Sangli › जत यात्रेत कीच सोहळा उत्साहात

जत यात्रेत कीच सोहळा उत्साहात

Published On: Dec 16 2017 1:48AM | Last Updated: Dec 15 2017 8:58PM

बुकमार्क करा

जत : प्रतिनिधी

महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री यल्लमादेवीच्या यात्रेत पाच लाखांवर भाविकांनी हजेरी लावली. यात्रेतील पारंपरिक कीच हा विधी लाखो भाविकांच्या उपस्थितीत, ‘आई उदो’च्या गजरात पार पडला. यात्रेची गुरुवारी सांगता  झाली.

श्री यल्लमादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांच्या उपस्थितीत गुरुवारी कीचचा कार्यक्रम पार पडला. सबीना व पालख्यांनी फेर्‍या मारल्यानंतर देवीच्या पुजार्‍याने कीचमध्ये प्रवेश केला. त्यानंतर यावर्षीची यात्रा संपन्न झाल्याची व पुढील वर्षातील यात्रेची घोषणा करण्यात आली.

सकाळी देवीची पालखी व सबीना यांची सवाद्य मिरवणूक डफळे यांच्या राजवाड्यावरून निघाली. शहरातून ही पालखी माने-पाटील यांच्या घरी आली. त्याठिकाणी विधीवत पूजा केल्यानंतर पालखी यात्रेकडे रवाना झाली. पालख्या व सबीना मंदिराजवळ आल्यावर पालख्यांचे रिंगण पार पडले. आई उदोऽऽ असा गजर करीत पालखी व सबीन्यावर खारीक, खोबरे, भंडारा उधळून भाविकांनी आपला नवस फेडला.

कीच विधी पार पडल्यानंतर पुजार्‍याने देवीच्या मुख्य गाभार्‍यात कोंडून घेतले. त्यानंतर देवीच्या गाभार्‍याचा दरवाजा परंपरेनुसार बंद करण्यात आला. अमावस्येला देवीचा दरवाजा उघडण्यात येणार आहे. यात्रेची अधिकृत सांगता झाली असली तरी आणखी आठवडाभर यात्रा सुरू असते. अमावस्येपर्यंत देवीचे दर्शन बंद असते. मात्र अमावस्येला पुन्हा यात्रा भरते व दर्शनासाठी रांगा  लागतात.