Thu, Jun 27, 2019 01:46होमपेज › Sangli › ज्येष्ठ नागरिकांसाठी विट्यात जनता दलाचा मोर्चा (व्‍हिडिओ)

ज्येष्ठ नागरिकांसाठी विट्यात जनता दलाचा मोर्चा (व्‍हिडिओ)

Published On: Jan 01 2018 3:08PM | Last Updated: Jan 01 2018 3:08PM

बुकमार्क करा
विटा : विजय लाळे

 महाराष्ट्र सरकारने ६० वर्षां पुढील वृद्ध लोकांना दरमहा २ हजार रुपये पेन्शन सुरु करावी या मागणीसाठी जनता दल (सेक्युलर) च्या वतीने विट्यात काढलेल्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. एकीकडे राज्य शासन माजी आमदार आणि मंत्र्यांच्या पेन्शनमध्ये भरमसाठ वाढ करीत असताना राज्य सरकारने सामान्य लोकांच्या या मागणीकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. पूर्वी काँग्रेस आणि आता भाजप सरकार आहे, परंतु कोणत्याही पक्षाचे सरकार असो लोकांच्या समस्येकडे कायम दुर्लक्षच केले असा आरोप मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या जनता दलाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सागर आणि राज्य कार्यकारिणी सदस्य जनार्दन गोंधळी यांनी केले.

खानापूर रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून मोर्चास सुरुवात झाली. यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.  यात किमान १ हजार लोक सामील झाले. यावेळी तासगावचे लक्ष्मण शिंदे , प्रतिभा चव्हाण , विजय चव्हाण, रघुनाथ रास्ते, विमल शिंदे, नवनाथ भारते, अरविंद कोळी आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी सागर यांनी देशातील इतर राज्यात वृद्धांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनबद्दल माहिती दिली.