जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथे शहरातील स्टेशन रोडवरील वर्दळीच्या ठिकाणी तिसर्या गल्लीत असलेल्या जैन श्वेतांबर मूर्तीपूजक मंदिरातील कार्यालयाचे कुलूप कटावणीने उचकटून चोरट्यांनी लोखंडी कपाट व स्ट्रॉगरूम फोडून 5 लाखाची रोकडसह देवाचे 20 तोळे सोने व 10 किलो चांदी असा एकूण सुमारे 16 लाखाचा ऐवज लंपास केला. मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेच्या दरम्यान ही धाडसी चोरी झाली. या चोरीने शहरात खळबळ उडाली.
सकाळी सहाच्या सुमारास सुरक्षा रक्षक आल्यानंतर चोरी उघडकीस आली. सात महिन्यांपूर्वी ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी पळविल्या होत्या. त्यामुळे शहरातील मंदिरेच चोरांचे टार्गेट असल्याचे दिसत आहे. चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना आव्हान दिले आहे.
स्टेशन रोडवर तिसर्या गल्लीत जैन श्वेतांबर मंदिर असून 15 वे तिर्थंकर धर्मनाथ स्वामींचे हे सन 1938 पासून मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या उत्तरेला कार्यालय, मागे पश्चिमेला दक्षिण कोपर्यात पुजारी निवासस्थान आहे. काही वर्षापासून या मंदिराचे संगमरवरी दगडात कोरीव बांधकाम सुरू आहे.
चोरट्यांनी कार्यालयाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. दर्शनी हॉलमधील लोखंडी कपाट फोडले. त्यामधील किल्ली घेवून स्ट्रॉगरूम उघडले. त्यामधील लोखंडी कपाट उघडून चार सोन्याचे हार, त्यामध्ये 8 तोळे वजनाचा गोकाक डिझाईनचा सातपदरी मण्याचा हार, प्रत्येकी पाच तोळ्याचे दोन व दोन तोळे वजनाचे दोन नेकलेस पध्दतीचे एकूण चार हार, दहा किलो चांदीचा पाठ व 5 लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केला. चोरट्यांनी कार्यालयाचे मुळ कुलूप उचकटून चोरी करून जाताना त्यांच्या जवळील कुलूप घालून पोबारा केला. स्ट्रॉगरूमच्या किल्ल्या व तोडलेले कुलूप झाडाच्या कुंडीत फेकून दिल्याचे आढळले.