Fri, Aug 23, 2019 23:14होमपेज › Sangli › इस्लामपूरमध्ये दारूबंदीचा ठराव

इस्लामपूरमध्ये दारूबंदीचा ठराव

Published On: Sep 05 2018 2:14AM | Last Updated: Sep 05 2018 2:14AMइस्लामपूर : वार्ताहर

गेली सहा महिने चर्चेत असलेल्या ‘इस्लामपूर शहरात दारूबंदी करावी’ या मागणीच्या ठरावाला  पालिकेच्या  सभेत अखेर मंगळवारी एकमताने  मंजुरी देण्यात आली. या ठरावावर दीड तास वादळी चर्चा झाली.

सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून शहरात दारूबंदी करण्यात यावी, असा प्रस्ताव उत्पादन शुल्क विभागाकडे देण्याचे ठरले. तसेच या विषयावर निर्णय होत नाही; तोपर्यंत शहरात नवीन दारू दुकाने आणि बीअरबारला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, असाही ठराव करण्यात आला.

शहरात दारूबंदी करण्याच्या मागणीची  गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती. आघाडीच्या नगरसेविका सुप्रिया पाटील यांनी दारूबंदीचा ठराव करावा, यासाठी सतत पाठपुरावा केला होता. मात्र, गेले सहा महिने पालिकेच्या  सभेत हा ठराव या ना त्या कारणाने तहकूब करण्यात येत होता. तत्पूर्वी आरोग्य समितीने शहरात दारूबंदी करावी, अशी शिफारस सभागृहाला केली होती. 

 सभेत आज हा ठराव पुन्हा 

चर्चेला आला. या विषयावर सत्ताधारी- विरोधकांनी सुमारे दीड तास वादळी चर्चा केली. सभागृहाला हा ठराव करण्याचा अधिकार आहे का, याची चौकशी करा. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करूनच ठराव करा. त्यामुळे त्याला  कोणी आव्हान देणार नाही, असे मत विरोधी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मांडले. 

सत्तारूढ आघाडीचे  पक्षप्रतोद विक्रम पाटील म्हणाले, शहराच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. त्यामुळे दारूबंदीचा ठराव करू या. दारूबंदी झाल्यास एक आदर्श शहर म्हणून  नावलौकिक होईल. अमित ओसवाल म्हणाले, दारूबंदीची चर्चा सुरू असताना माझ्या प्रभागात बीअर बारला नाहरकत प्रमाणपत्र का दिले? 

राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे म्हणाले, दारूबंदीसारखा ऐतिहासिक ठराव सभागृहात येत आहे.

 त्यामुळे राज्य शासनाचे निर्देश नजरेसमोर ठेवून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. महामार्गालगतच्या  दारूबंदीचे पुढे काय झाले, त्याचे उदाहरण ताजे आहे. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी नको.
ते म्हणाले, हा ठराव कागदावर न राहता तो प्रत्यक्ष अंमलात यावा यासाठी कायदेशीर बाबी पडताळून ठराव करूया. राष्ट्रवादी पक्ष याला एकमुखी पाठिंबा देत आहे.

खंडेराव जाधव म्हणाले, दारूबंदीला कोणाचाही विरोध नाही. ती झालीच पाहिजे. पण ठराव करताना त्याचा पाया भक्कम  हवा. केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी हा ठराव नको. दारूबंदी करण्याचा मुळात आरोग्य समितीला अधिकारच नाही. त्यामुळे तो ठरावच बेकायदेशीर आहे. तो आपण करायचा का? हा केवळ देखावा व स्टंट आहे.


शहाजीबापू पाटील म्हणाले, दारूबंदी झालीच पाहिजे. मात्र ती संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात व्हावी असा ठराव करूया. वैभव पवार म्हणाले, हा ठराव सभागृहात आल्यानंतरही पालिकेने ज्या बिअरबार व दारू दुकानांना नाहरकत प्रमाणपत्रे दिली आहेत ती सर्व रद्द करण्यात यावीत.  विश्‍वास डांगे, सुप्रिया पाटील, कोमल बनसोडे, शकील सय्यद, सुनिता सपकाळ यांनीही चर्चेत भाग घेतला.

सर्व नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी हा ठराव मांडल्याबद्दल आरोग्य समितीचे अभिनंदन केले. तसेच हा ठराव सभागृह सर्वानुमते मंजूर करीत असल्याचे जाहीर केले. 

या ठरावावर   उत्पादन शुल्क विभागाने योग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्याचे निश्‍चित झाले. तसेच या ठरावावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत  नवीन बिअर आणि दारू दुकानांना नाहरकत प्रमाणपत्र देऊ नये असेही ठरले. हा ठराव केल्याबद्दल सुप्रिया पाटील यांनी सभागृहाचे आभार मानले.