होमपेज › Sangli › बेफिकीर ऊस वाहतुकीने वाढते अपघात

बेफिकीर ऊस वाहतुकीने वाढते अपघात

Published On: Mar 03 2018 1:44AM | Last Updated: Mar 02 2018 9:27PMकवठेपिरान : संजय खंबाळे 

मिरज पश्‍चिम भाग हा हुकमी ऊस पट्टा म्हणून राज्यात ओळखला जातो. आता या सार्‍या भागात ऊस तोडणीची धांदल धूमधडाक्यात सुरू आहे. मात्र बेफिकीरीने ऊस वाहतूक करणारी वाहने अपघातांना आमंत्रण देणारी ठरू लागली आहेत. दरम्यान, याबाबत संबंधित यंत्रणा मात्र डोळेझाक करत असल्याने तीव्र नाराजी उमटू लागली आहे.

सांगली - कवठेपिरान, आष्टा - दुधगाव, दुधगाव - कवठेपिरान या मार्गांवर ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र विशेषत: रात्रीच्या वेळी ऊस भरलेले अनेक ट्रॅक्टर रस्त्यावर बेधडक उभे केले जात आहेत. यातील अनेक ट्रॅक्टरना  रिफ्लेक्टर बसविलेला नाही. त्यामुळे ही वाहने रात्रीच्या वेळी दिसत नाहीत. त्यामुळे मोटारसायकलस्वार या ट्रॅक्टरना धडकून जीवघेण्या अपघाताच्या दुर्घटना घडत आहेत. 

यात गांभिर्याची गोष्ट म्हणजे ऊस वाहतूक करणारी अनेक वाहने भरधाव चालविली जातात. तर अनेकदा रस्त्यांच्या मधूनच ही वाहने चालविली जातात. आपलाच रस्ता आहे, अशा थाटात चालक बर्‍याचवेळा ही वाहने चालवित असल्याने अन्य वाहनचालकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. त्या ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात गाणी सुरू असतात. अनेकवेळा त्यामुळेच अपघात घडत आहेत. मात्र यावर पोलिस नियंत्रण ठेवू शकले नसल्याचे चित्र आहे. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणचे कमालीची जोखीम ठरू लागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पण हे अपघात कधीही जीवघेणे ठरू शकतात. या भागामध्ये वाहतूक पोलिसांचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.  वाहतूक पोलिसांनी मोठा अपघात होण्याअगोदरच या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.