Thu, Sep 20, 2018 19:54



होमपेज › Sangli › सांगली झाली शिवमय

सांगली झाली शिवमय

Published On: Feb 20 2018 1:16AM | Last Updated: Feb 19 2018 10:23PM



सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज की जय..., जय भवानी... जय शिवाजी... आदी घोषणांचा जयघोष, लेझीम, झांजपथक यासह विविध वाद्यांच्या तालावर निघालेल्या मिरवणुका यामुळे शहरात सोमवारी सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जल्लोष सुरू होता. अनेकांच्या घरीही शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.   

शिवजयंती साजरी करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून ठिकठिकाणी तयारी सुरू होती. रविवारी रात्री बाराच्या सुमारास शिवाजी मंडईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम, काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील, श्रीरंग पाटील, संजय देसाई, आसिफ बावा, आश्रफ वांकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित  होेते. शिवाजी महाराजांचा पुतळा आणि परिसर फुले, विद्युत रोषणाई यांनी सजवण्यात आला होता. पुतळ्याचे पूजन केल्यानंतर घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

बहुजन प्रतिपालक शिवमहोत्सव समितीने घरोघरी शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे सकाळी सहा ते नऊ या वेळेत अनेकांनी घरी प्रतिमेचे पूजन केले. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आमदार सुधीर गाडगीळ, महापौर हारुण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, आयुक्त रविंद्र खेबुडकर, माजी आमदार नितीन शिंदे, सुरेश दुधगावकर, माजी उपमहापौर युवराज बावडेकर, प्रियानंद कांबळे आदींनी अभिवादन केले. 

येथील स्टेशन चौकात बहुजन प्रतिपालक शिवमहोत्सव समितीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना केली आहे. त्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात महापौर हारुण शिकलगार, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जयश्री पाटील, विशाल पाटील,  पृथ्वीराज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित राऊत, शिवसेनेचे युवानेते पृथ्वीराज पवार, डॉ. संजय पाटील, श्रीरंग पाटील, आसिफ बावा, अय्याज नायकवडी, विजयराव भोसले, राहुल पाटील, सुधाकर पाटील, अ‍ॅड. अमित शिंदे, सुनील गिड्डे, कय्यूम पटवेगार, नितीन चव्हाण, प्रमोद कुदळे, लालू मेस्त्री, नितीन गोंधळे, युसूफ पठाण, अशोक पवार, उमर गवंडी आदी सहभागी झाले होते. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत   पारंपरिक वेशभूषा केलेले मावळे, लेझीम, झांजपथक  आदींचा समावेश होता. घोड्यावरुन निघालेले मावळेही होते. स्टेशन चौकातून निघालेली ही मिरवणूक - राजवाडा- महापालिका- शिवाजी मंडई- बदाम चौक या मार्गावरून ही मिरवणूक पुन्हा स्टेशन चौकात येऊन त्याची सांगता झाली. 

रॉयल्स ग्रुफ फौंडेशनतर्फे मिरवणूक 

शिवसेना नेते नगरसेवक शेखर माने यांच्या रॉयल्स ग्रुप फौंडेशनच्यावतीने शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममधून त्याचा प्रारंभ करण्यात आला. शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून पुन्हा मिरवणूक स्टेडियममध्ये आली. अपघातात मृत्यू पावलेल्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.

मिरवणुकीत सजविलेला शिवप्रतिमा रथ अग्रस्थानी होता. फेटेधारी तरुणी, हजारांवर  मोटारसायकलस्वार, ध्वजधारी तरुण आदी सहभागी झाले होते.  उपअधीक्षक अशोक वीरकर, उपमहापौर विजय घाडगे, पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके आदींची उपस्थिती होती. स्टेशन चौक, महापालिका चौकमार्गे मिरवणूक मध्यवर्ती शिवस्मारक येथे आली. तेथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तेथून डॉ. आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक पुन्हा आंबेडकर स्टेडियममध्ये आली.

पन्हाळ्यातून शिवज्योत आणताना झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मिरवणुकीचे संयोजन युवासेनेचे शहराध्यक्ष ऋषीकेश पाटील, अभिजित पाटील, रोहित पाटील, यश माने, रोहित भजनाईक,  रतन कोरडे, पांडुरंग व्हनमाने, राजकुमार शिंदे यांनी संयोजन केले होते. 
शिवजयंतीनिमित्त युवा सेनेतर्फे वेलणकर अनाथाश्रमात भोजन, रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मदनभाऊ युवा मंचतर्फे जयंती

मदनभाऊ पाटील युवा मंचतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  सुभाष यादव, संतोष पाटील, शीतल लोंढे, प्रवीण निकम, अमित लाळगे आदी उपस्थित होते.