Wed, May 22, 2019 17:09होमपेज › Sangli › सांगलीत रेल्वेपूरक उद्योग देऊ : ना.सिन्हा

सांगलीत रेल्वेपूरक उद्योग देऊ : ना.सिन्हा

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 10:55PMसांगली : प्रतिनिधी

केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा करून सांगलीत रेल्वे कोच निर्मितीसारखा पूरक लहान-मोठा उद्योग देण्यासाठी प्रयत्न करू, असे केंद्रीय रेल्वे व दूरसंचार राज्यमंत्री  मनोज सिन्हा यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. 

जंक्शन असलेले मिरज रेल्वेस्थानक लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. मिरज-पुणे रेल्वेच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम 2021 पर्यंत पूर्ण करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, रेल्वेस्थानकासह रेल्वेमध्ये महिलांच्या छेडछडीचे प्रकार वाढले आहेत. त्यासाठी नवीन भरतीत 50 टक्के महिला सुरक्षारक्षक नेमण्यात येतील. सिन्हा म्हणाले, मिरज रेल्वे स्थानकाला 150 हून अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या तुलनेत रेल्वे स्थानकात विविध सुविधांची गरज आहे.  जेथे रोज 25 हजारांपेक्षा अधिक प्रवासी वर्दळ आहे अशा मिरजेसह सहा रेल्वेस्थानकांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात येणार आहे.त्याअंतर्गत कलेक्टर लिफ्ट, वायफाय, सी सी टीव्ही कॅमेरा, सुरक्षा आदींसह विविध सुविधा देण्यात येणार आहेत.  अगदी ग्रामीण रेल्वे स्थानकापर्यंत अशा सुविधा पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

ते म्हणाले, खासदार संजय पाटील यांनी पाठपुरावा करून पुणे-मिरज रेल्वे दुहेरीकरणाचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. त्यासाठी 2436 कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.  त्याअंतर्गत 278 किलोमीटर रेल्वे रुळाचे 

काम सुरू असून, गेल्यावर्षी त्यावर 120 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यावर्षीही 436 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुणे-मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्ग विद्युतीकरणासाठीही 566 कोटी रुपये  मंजूर करण्यात आले आहेत. ही सर्व कामे  2021 पर्यंत पूर्ण करू. विविध रेल्वेस्थानकाजवळ आणि मार्गावर होणारे  अपघात रोखण्यासाठी  सुरक्षा भिंती बांधण्यात येतील. 

सिन्हा म्हणाले, कराड-चिपळूण रेल्वे मार्गाचे कामही कोकण रेल्वेमार्फत करण्यात येणार आहे. त्याची प्रक्रियाही  लवकरच पूर्ण होईल.  रेल्वे प्रवास आणि उत्पन्नात तब्बल 23 पट वाढ झाली आहे. पण दुदैवाने यापूर्वीच्या सरकारने केवळ अडीचपटच नेटवर्कमध्ये वाढ केली होती.  गतिमानतेबाबत लोकांच्या अपेक्षा पूर्वीचे सरकार पूर्ण करू शकले नव्हते. भाजप सरकारने गेल्या तीन वर्षांत सहापट त्यात वाढ केली आहे. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील उपस्थित होते.