होमपेज › Sangli › सव्वाशे पिस्तुले जप्त, शंभरावर संशयितांना अटक

सव्वाशे पिस्तुले जप्त, शंभरावर संशयितांना अटक

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 10:27PMसांगली : अभिजित बसुगडे

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कार्यभार घेतल्यापासून गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील अनेक टोळ्यांवर मोक्का, स्थानबद्ध, हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या साडेचार वर्षात पोलिसांनी विदेशी बनावटीची पिस्तूल, रिव्हॉल्वर, गावठी कट्टे, देशी बनावटीची पिस्तूल, रिव्हॉल्वर जप्त केली आहेत. यामध्ये सव्वादोनशेहून अधिक काडतुसे, सव्वाशेहून अधिक पिस्तूल असा पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 63 गुन्ह्यांत 107 संशयितांना अटक करण्यात आली आहे. 

डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी शस्त्र तस्करांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातच सांगली महापालिकेच्या निवडणुकीमुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी अधीक्षक शर्मा यांनी सर्व पोलिस दलाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे अग्नीशस्त्रासह विविध प्रकारची शस्त्रे बाळगणार्‍यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

केवळ गावठी कट्टे, पिस्तूल, रिव्हॉल्वर यांची खरेदी-विक्री करणार्‍यांवर कारवाई करून पोलिस दल थांबलेले नाही तर त्याची निर्मिती करणार्‍यांवरही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी देशी बनावटीची पिस्तूल तयार करणारी टोळी होती. मात्र आता अशी एकही टोळी शिल्लक राहिलेली नाही. मात्र त्यांचे कंबरडेच पोलिस दलाने मोडून काढले होते. त्यानंतर येथील गुन्हेगारांनी राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक येथून शस्त्रे खरेदी करण्यास सुरुवात केली होती. 

मात्र गतवर्षी पोलिसांनी मध्यप्रदेश येथील अशा कारखान्यावर छापा टाकला होता. त्यावेळी सांगलीच्या पोलिसांवर हल्लाही करण्यात आला होता. मात्र त्या घटनेनंतर शस्त्रांची तस्करी कमी झाल्याचे चित्र आहे. अधीक्षक शर्मा यांनी बाहेरच्या राज्यातून आणलेली शस्त्रे विकणार्‍यांनाच टार्गेट केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक गुन्हेगारी कारवायांना आळा बसला आहे. 

बर्‍याच वर्षानंतर मणेराजुरीत देशी पिस्तुलाने गोळ्या झाडून एकाचा खून करण्यात आला. त्यामुळे मोठ्या शहरांसह ग्रामीण भागातही शस्त्रांची तस्करी करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज निर्माण झाली आहे.