Tue, Apr 23, 2019 01:36होमपेज › Sangli › अनैतिक संबंधातून पत्नीनेच केला पतीचा खून 

अनैतिक संबंधातून पत्नीनेच केला पतीचा खून 

Published On: May 03 2018 1:31AM | Last Updated: May 03 2018 1:31AMविटा : प्रतिनिधी 

अनैतिक संबंधास अडसर ठरणार्‍या पतीचा मेहुणा आणि त्याच्या मामेभावाच्या साथीने खुद्द पत्नीनेच खून केल्याची धक्कादायक घटना विट्याजवळील घाडगेवाडी येथे मंगळवारी रात्री घडली आहे.  अरुण प्रल्हाद घाडगे (वय 31) असे मृताचे नाव असून तो गलाई व्यावसायिक होता. मृत अरुण घाडगे यांच्या पश्‍चात पत्नी, आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. 

याप्रकरणी सुहास तुकाराम शिंदे (26) आणि रूपाली अरुण घाडगे (23) या दोघांना विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसरा संशयित अक्षय रघुनाथ पिसाळ (25) हा फरारी आहे. याबाबत मृत अरुणचे वडील प्रल्हाद मारुती घाडगे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः अरुण घाडगे यांचा दिल्लीतील चांदणी चौकात गलाई व्यवसाय आहे. त्यांचे मूळ गाव घाडगेवाडी  आहे.  चुलत भावाच्या लग्नासाठी ते गावी आले होते. बुधवारी हे लग्न होते.   मंगळवारी सायंकाळी गावदेवाचा कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर  अरुण घाडगे अचानक गायब झाले होते. गाडी व मोबाईल ते घरातच विसरून गेल्याने  कुटुंबियांनी आणि गावकर्‍यांनी शोधाशोध सुरू केली. 

मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास विटा- पारे रस्त्याच्या कडेला शेतातील जनावरांच्या शेडसमोर हत्ती घासात घाडगे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. डोक्यात फरशी कुर्‍हाडीने वार करून  गळा आवळून त्यांचा कोणीतरी खून केल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. 

दरम्यान विटा पोलिस आणि स्थनिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तातडीने या गुन्ह्याला वाचा फोडण्याचे काम सुरू केले. 

अरुण याचा विवाह विट्याचे उपनगर असलेले  सूर्यनगर येथील रुपाली सूर्यवंशी हिच्याबरोबर  डिसेंबर 2017 मध्ये झाला होता. मात्र त्यापूर्वीपासूनच तिचे  तिची थोरली बहीण दीपाली हिचा पती सुहास शिंदे याच्याबरोबर अनैतिक संबंध होते. दीपालीचे  लग्न चार वर्षांपूर्वी झाले होते. सुहास हा  विट्याजवळील  भवानीनगर या उपनगरात राहतो. 

रुपाली  पतीबरोबर दिल्लीत राहत होती. मात्र संसारात रमली नाही. अखेरीस तिने  आपल्या अनैतिक संबंधांना बाधा येऊ नये म्हणून मेहुण्याच्या साथीने नवर्‍याचा गेम करायचे ठरवले.  मंगळवारी दुपारी चार वाजता ती पोटात दुखत असल्याचा बहाणा करून पती अरुण बरोबर विट्यात आली. तिथे मेहुणे सुहास आणि अक्षय यांना बोलवून घेतले. त्यानंतर प्लॅन आखला.

रात्री सगळे गाव देवाच्या कार्यक्रमात  व्यस्त असताना अरुणला सुहास आणि अक्षयने बोलावून घेतले. त्याला त्या जनावरांच्या शेडमध्ये नेले. तिथे आधी मद्यपान केले. नंतर अरुणचा काटा काढला. त्यावेळी रुपाली घरातच होती.  सर्वांच्या बरोबर तिनेही अरुणला शोधण्याचे नाटक केले. अंत्यविधीच्या वेळी सुहासही  दुःखी असल्याचे भासवत होता. विटा पोलिसांनी रात्रीच घटनास्थळाची पाहणी केली आणि  तपास सुरू केला. मृत अरुणच्या खिशात चार हजार रुपये तसेच होते . तसेच हातातील अंगठी तशीच होती . 

सुरुवातीला पैशांसाठी अगर इस्टेटीच्या वादातून खून झाला असावा असा संशय होता.  परंतु परिस्थितीजन्य पुरावे आणि ग्रामस्थ व  नातेवाईक यांच्या कुजबुजीतून  संशयाचा धागा बळकट झाला. अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि विटा पोलिस यांनी अत्यंत सावधपणे 12 तासात गुन्ह्याचा छडा लावला. पोलिस निरीक्षक रविंद्र पिसाळ अधिक तपास  करीत आहेत.