Sat, Mar 23, 2019 16:07होमपेज › Sangli › ‘इचलकरंजी’चा भार ‘सांगली’वर!

‘इचलकरंजी’चा भार ‘सांगली’वर!

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 1:27AMसांगली : अभिजित बसुगडे

दक्षिण महाराष्ट्रासह कोकण आणि कर्नाटकातील रुग्णांना दिलासा देणार्‍या सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलवर इचलकरंजीच्या आयजीएमचा (इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय) भार पडत आहे. आयजीएममध्ये दाखल होणारे किरकोळ स्वरूपाच्या आजाराचे रुग्णही थेट सांगलीच्या सिव्हिलमध्ये पाठविले जातात. 

उच्च दर्जाची रुग्णसेवा तसेच तत्पर उपचारांमुळे सांगलीच्या सिव्हिलचा दक्षिण महाराष्ट्रच नव्हे; तर कोकण आणि कर्नाटकातही नावलौकिक आहे. भाजलेले रुग्ण हमखास बरे करणारे रुग्णालय म्हणून सांगलीच्या सिव्हिलकडे पाहिले जाते. येथे रोज एक हजार ते बाराशे रुग्ण बाह्यरूग्ण विभागात तपासले जातात. मात्र याच नावलौकिकाचा नाहक त्रास आता सिव्हिलला होत असल्याचे चित्र आहे. दक्षिण महाराष्ट्रासह अन्य ठिकाणांहून प्रकृती गंभीर असलेले रुग्ण सिव्हिलकडे पुढील उपचारांसाठी ‘रेफर’ केले जातात. 

मात्र इचलकरंजीत असणारे शासकीय रुग्णालय (आयजीएम) येथून मात्र सर्रास रुग्ण सांगलीच्या सिव्हिलकडेच पाठवले जात आहेत. किरकोळ अपघातानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेल्या रुग्णवाहिकेतून रुग्णाला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र अपघात किंवा अन्य घटनांतील रुग्ण आयजीएमला नेल्यानंतर रुग्णवाहिकेतील डॉक्टरना तेथील वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस सांगली सिव्हिलला जाण्याचा सल्ला देतात, अशी तक्रार संबंधित वारंवार करीत आहेत. 

‘शिफारसी’साठी या रुग्णालयाने एक छापील फॉर्मच तयार करून ठेवला आहे. कोणताही रुग्ण आला की त्याचे नाव लिहून तो फॉर्म रुग्णाकडे देतात आणि त्याला थेट सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात पाठविले जाते. त्याशिवाय आयजीएममध्ये दाखल असलेले थोड्या गंभीर रुग्णांना सायंकाळी सहानंतर सिव्हिलला हलविण्याचा सल्ला दिला जातो. नातेवाईकांना रुग्ण हलवण्यासाठी तगादा लावला जातो.

सांगलीच्या सिव्हिलमध्ये रोज सरासरी शंभरावर एमएलसी (मेडिको लिगल केस) दाखल होतात. त्यातील किमान पंचवीस केस या केवळ इचलकरंजी परिसरातील असल्याचे दिसून येते. यामध्ये मोटारसायकल घसरून पडून खरचटलेल्या रुग्णांचाही समावेश असतो. किरकोळ हाणामारीतील रुग्णांवरही कोणतेही उपचार न करता थेट सांगलीला पाठविले जाते. आयजीएमचा सारा भार सांगलीच्या सिव्हिलवर पडत आहे. रुग्ण ‘रेफर’ करताना छापील फॉर्मवरील सर्व माहिती भरली जात नाही. त्यामुळे नव्याने कागदपत्रे तयार करण्याचे सोपस्कार अधिकार्‍यांना करावे लागतात, अशी तक्रार आहे.

किरकोळ गुन्ह्यांचा पोलिसांना नाहक त्रास 

मोटारसायकल घसरून पडलेले, विषारी औषध प्राशन केलेले, मारहाणीतील जखमी असे सर्व प्रकारचे रूग्ण आयजीएममधून थेट सांगली सिव्हिलला रेफर केले जातात. तेथे त्यांची एमएलसी नोंद केली जात नाही. त्यामुळे अशा रुग्णांचे जबाब घेऊन ते झिरो क्रमांकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंदवून इचलकरंजीतील संबंधित पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्याचे काम येथील पोलिसांना करावे लागत आहे. गेल्या दोन वर्षांत इचलकरंजीचे पोलिस तेथील गुन्ह्यासंदर्भातील व्यक्तींचे जबाब घेण्यासाठी सांगली सिव्हिलला आल्याचे एकही उदाहरण नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इचलकरंजीतील किरकोळ गुन्हे येथे नोंदवून घेऊन ते तिकडे वर्ग करण्याचा नाहक त्रास सांगली पोलिसांना सहन करावा लागत आहे. 

इचलकरंजी पालिकेकडील आयजीएम रुग्णालय वर्षापूर्वी आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यातील 42 कर्मचारीही वर्ग केले आहेत. मात्र गेले वर्षभर त्यांचे पगार झालेले नाहीत. त्याशिवाय येथे फक्त चारच डॉक्टर कार्यरत आहेत. आंतररूग्ण विभाग बंदच आहे. रुग्णांवर उपचारासाठी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथे येणारे रुग्ण अन्य रुग्णालयात पाठविण्यात येतात.  
- डॉ. सुप्रिया देशमुख, वैद्यकीय अधीक्षक, आयजीएम