Tue, Apr 23, 2019 23:47होमपेज › Sangli › सांगलीत भाजपच्या उपोषणाला प्रतिसाद

सांगलीत भाजपच्या उपोषणाला प्रतिसाद

Published On: Apr 13 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 11:40PMसांगली : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजपतर्फे  गुरुवारी येथे उपोषण करण्यात आले. संसदेचे कामकाज चालू न दिल्याबद्दल काँग्रेसचा निषेध करण्यात आला.  खासदार संजय पाटील, आमदार  सुधीर गाडगीळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्यांची उपोषणस्थळी दिवसभर वर्दळ होती. परिणामी गर्दी वाढल्यामुळे अचानक मंडपाचा आकार  वाढवण्याची संयोजकांवर वेळ आली. 

 सकाळी दहापासून कार्यकर्ते येण्यास सुरुवात झाली. अकराच्या सुमारास खासदार पाटील आले.  आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख,  भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, गोपीचंद पडळकर,  राजाराम गरुड, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे,  शेखर इनामदार, सांगली बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, श्रीकांत शिंदे, अरविंद तांबवेकर तसेच  नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आदी सहभागी झाले होते.उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळात महापालिका क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने येऊ लागले. विशेषतः महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची गर्दी झाली. त्यामुळे  मंडप अपुरा पडू लागला. त्यामुळे मंडपाचा आकार वाढवण्याच्या सुचना देण्यात आल्या. काही काळ हजेरी लावल्यानंतर प्रमुखांसह कार्यकर्त्यांनीही काढता पाय घेतला. खासदार पाटील आणि आमदार गाडगीळ यांच्यासह काही जण सायंकाळपर्यंत थांबून होते. 

खासदार पाटील पत्रकारांना म्हणाले,  विरोधी पक्षांच्या आडमुठ्या धोरणांमुळे संसदेचे कामकाज होऊ शकले नाही.  काँग्रेसने केलेली ही लोकशाहीची थट्टा आहे.   ते त्यांच्या बौध्दिक दिवाळखोरीचे दर्शन होते. काँग्रेसची जनहितविरोधी भूमिका देशातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि या अपप्रवृत्तींचा निषेध करणे यासाठी हे उपोषण होते.

Tags : Sangli, hunger strike, response BJP, sangli news,