Wed, Nov 21, 2018 23:31होमपेज › Sangli ›  शंभरफुटी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली

 शंभरफुटी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली

Published On: Mar 09 2018 1:36AM | Last Updated: Mar 08 2018 11:52PMसांगली : प्रतिनिधी

येथील शंभरफुटी रस्त्यावर महापालिकेच्या अतिक्रमण निूर्मलन पथकाने पोलिस बंदोबस्तात गुरुवारी अतिक्रमण हटावची कारवाई केली. यावेळी चार बंद अवस्थेतील गाड्या, चार हातगाड्या जप्त करण्यात आल्या. कारवाईदरम्यान अतिक्रमण करणार्‍यांनी वाद करीत विरोध केला. यामुळे तणाव निर्माण झाला होता. महापालिका आणि वाहतूक पोलिस शाखेने 170 जणांना नोटिसा बजावल्या. 

शहरातील मुख्य मार्ग असलेला शंभरफुटी रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणांच्या विळख्यात अडकला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडावी यासाठी अनेक वर्षे मागणी सुरू आहे. त्यासंदर्भात सर्वपक्षीय कृती समितीने जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत आणि महापालिकेच्या लोकशाही दिनातही मागणी करण्यात आली होती. नागरिकांकडून यासंदर्भात रेटा सुरू होता.

सहाय्यक आयुक्‍त श्री. खरात, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांच्यासह टीमने पोलिस बंदोबस्तात कारवाईचा बाडगा उगारला. यावेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल निकम तसेच विश्रामबाग पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता. पथकाने रस्त्याकडेला असलेल्या बंद गाड्या क्रेनने उचलून जप्त केल्या. रस्त्याकडेला असलेल्या हातगाड्याही जप्त करण्यात आल्या. कारवाईदरम्यान काही सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी विरोध केला. पथकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे तणाव निर्माण झाला होता. 

वाहतूक पोलिसांनी रस्त्याकडेला बंद असलेल्या 40 गाड्यांच्या मालकांना तर महापालिकेने 130 हून अधिक हातगाडेवाल्यांना नोटिसा बजावल्या. दरम्यान पुन्हा सोमवारपासून कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. घोरपडे यांनी सांगितले.