Tue, Oct 22, 2019 02:27होमपेज › Sangli › हिवरे खूनप्रकरण : सरकार पक्षाचा युक्तीवाद पूर्ण

हिवरे खूनप्रकरण : सरकार पक्षाचा युक्तीवाद पूर्ण

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 30 2017 11:56PM

बुकमार्क करा
सांगली : वार्ताहर

हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी खून खटल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी कलम बदलण्याच्या अर्जावर शनिवारी युक्तीवाद केला. बचाव पक्षाचे वकील प्रमोद सुतार यांनी यापूर्वी अर्जाला विरोध केला आहे. या अर्जावर दि. 5 जानेवारीला जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर निर्णय देणार आहेत. 

या खटल्यातील संशयित सुधीर घोरपडे याच्या बहिणीचा सासरच्या लोकांनी जाळून खून केल्याचा आरोप आहे. या खटल्यातून सासरचे लोक निर्दोष सुटल्याच्या रागातून सुधीर सदाशिव घोरपडे (रा. धोंडेवाडी, ता. खानापूर) व रविंद्र रामचंद्र कदम (रा. भूड, ता. खानापूर) यांनी दि. 21 जून 2015 रोजी चाकू व अन्य धारदार शस्त्रांनी तिघांचा खून केला होता. 

या हल्ल्यात विद्याराणी बाळासाहेब शिंदे, प्रभावती ब्रम्हदेव शिंदे, सुनीता संजय पाटील यांचा खून झाला होता. याप्रकरणी बाळासाहेब ब्रम्हदेव शिंदे यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी सुधीर घोरपडे, रवींद्र कदम यांना पोलिसांनी अटक केली आहे. शासनाने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. निकम यांची नियुक्ती केली आहे.  आरोपपत्रातील पर्यायी कलम बदलण्यासाठी सरकार पक्षातर्फे यापूर्वी अर्ज करण्यात आला आहे. कायद्यानुसार पर्यायी कलम लावता येत नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे मागील सुनावणीवेळी केला होता. त्यावर अ‍ॅड. निकम यांनी युक्तीवाद केला. आरोपत्रातील त्रुटी खटल्याच्या कोणत्याही टप्प्यात दूर करण्याचे अधिकार सरकार पक्षाला आहेत. त्यामुळे कलम बदलण्याचा अर्ज मंजूर करावा, असा युक्तीवाद अ‍ॅड. निकम यांनी केला. त्यावर 5 जानेवरीला सुनावणी होणार आहे. 


WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19