Wed, Apr 24, 2019 08:03होमपेज › Sangli › अजब धोरण.. हाय मेरिट, लो स्कॉलरशिप

अजब धोरण.. हाय मेरिट, लो स्कॉलरशिप

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 9:46PMसांगली : उध्दव पाटील

राज्य शासनामार्फत घेण्यात येत असलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ‘हाय मेरिट’  विद्यार्थांना ‘लो स्कॉलरशिप’ आणि तुलनेने ‘लो मेरिट’ विद्यार्थ्यांना ‘हाय स्कॉलरशिप’, अशी काहीशी अजब विसंगती आहे. ‘हाय मेरिट’च्या विद्यार्थ्यांना वार्षिक 500 रुपये व 750 रुपये, तर त्याहून कमी मेरिटच्या विद्यार्थ्यांना वार्षिक 1 हजार व 1 हजार 500 रुपये शिष्यवृत्ती मिळत आहे. ही विसंगती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ध्यानी केव्हा येणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.  

पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) व पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेते. शिष्यवृत्ती प्रकारनिहाय शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी संख्या निश्‍चित केलेली आहे. पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी राज्यातून 16 हजार 693 विद्यार्थी व आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी 16 हजार 588 विद्यार्थी निवडले जातात. जिल्हानिहाय लोकसंख्येनुसार शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी संख्या निश्‍चित केलेली आहे. पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय ग्रामीण, ग्रामीण सर्वसाधारण व शहरी सर्वसाधारण, तर आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय ग्रामीण, ग्रामीण सर्वसाधारण, शहरी सर्वसाधारण, ग्रामीण अनुसूचित जाती, ग्रामीण भूमिहून शेतकर्‍यांची मुले, ग्रामीण आदिवासी असे शिष्यवृत्तीचे प्रकार आहेत. 

पहिल्या दहा विद्यार्थ्यांवर अन्याय

पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागात जिल्ह्यात पहिल्या दहा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती मिळते. या विद्यार्थ्यांहून कमी मेरिट असणारे विद्यार्थी ग्रामीण सर्वसाधारण यादीत असतात. मात्र हाय मेरिटच्या विद्यार्थ्यांना कमी (वार्षिक 500 रुपये / 750 रुपये) शिष्यवृत्ती रक्कम आणि तुलनेने कमी मेरिट असलेल्या विद्यार्थ्यांना जास्त (वार्षिक 1000 रुपये / 1500 रुपये)शिष्यवृत्ती दिली जात आहे. गेल्या काही वर्षात शहरी विभागापेक्षाही ‘राष्ट्रीय ग्रामीण’ चे मेरिट अधिक लागत आहे. मात्र त्यांनाच शिष्यवृत्ती रक्कम कमी दिली जात आहे. ही विसंगती दूर करण्याबरोबरच शिष्यवृत्तीत भरीव वाढ अपेक्षित आहे. 

जिल्हापरिषद शाळा पुढे कारण.. !

पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद शाळा बोरगाव (ता.कवठेमहांकाळ) ची विद्यार्थिनी आरती चंद्रकांत पाटील 93.28 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम आली आहे. शहरी व ग्रामीणमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामीण विभागाच्या राज्य गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील 13 विद्यार्थी आहेत. त्यापैकी पहिले 8 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेचे आहेत. शिष्यवृत्तीस पात्र 388 पैकी 136 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेचे आहेत. जिल्हा परिषद शाळांची ही कामगिरी उल्लेखनीय आहे. खासगी शाळांबरोबर स्पर्धा करण्यास स्वयंप्रेरणेने सरसावलेले जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक हे कारण महत्वाचे त्यामागे आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी जादा तास, रात्रअभ्यासिका, चौथीची वार्षिक परीक्षा संपल्यानंतर ते उन्हाळी सुटी लागेपर्यंतच्या कालावधीत पाचवीच्या शिष्यवृत्तीचा अभ्यास घेणे हे उपक्रम सुरू आहेत. 

दुसरी, तिसरीपासूनच प्रज्ञाशोध

राज्य गुणवत्ता यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड तालुक्यातील विद्यार्थी संख्येने नेहमीच जास्त असतात. त्याचा अभ्यास करून तासगाव व कवठेमहांकाळ पंचायत समितीने तासगाव तालुका टॅलेंट सर्च व कवठेमहांकाळ तालुका टॅलेंट सर्च परीक्षा सुरू केली होती. दुसरी, तिसरी आणि सहावीतील हुशार विद्यार्थ्यांचा शोध घेऊन चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी केली जात होती. गेली दोन वर्षे हा उपक्रम बंद झाला असला तरी तो आता पुन्हा नव्याने सुरू होणे गरजेचे आहे. या दोन तालुक्यापुरतेच नव्हे तर जिल्हाभर हा उपक्रम सुरू होणे आवश्यक आहे. 

शासनाने 2016-17 पासून शिष्यवृत्तीचा स्तर चौथी ऐवजी पाचवी  व सातवी ऐवजी आठवी केला आहे. सांगली जिल्हा परिषदेने स्वीय निधीतून चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षाही घेण्याचा निर्णय घेतला. पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी म्हणून ही परीक्षा उपयुक्त ठरणार होती. जिल्हा परिषदेन सन 2015-16 मध्ये ही परीक्षा घेतली. मात्र आरटीईनुसार माहितीच्या अधिकारात एक पत्र आले आणि त्यावर विद्या प्राधिकरणने मार्गदर्शन पाठविले. त्यामुळे खासगी स्पर्धा परीक्षांवर गंडातर आले. जिल्हा परिषदेने सुरू केलेली चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षाही बंद झाली. 

यावेळपासून पूर्वतयारी परीक्षा : संग्रामसिंह देशमुख, अभिजीत राऊत

‘सन 2018-19 साठी पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी म्हणून चौथी व सातवीतच स्वीय निधीतून परीक्षा घेतली जाणार आहे. चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा व तालुकास्तरावर पहिल्या तीन अशा एकूण 12 विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे आणि 400 विद्यार्थ्यांना 500 रुपये शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे’, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, शिक्षण सभापती तम्मनगौडा रवि-पाटील, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी दिली.  

महापालिकेचे अवघे 2 विद्यार्थी; नवे कारभारी परिस्थिती सुधारणार?

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा हा विषय नेहमीच चर्चेत राहिला आहे. पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यातील 436 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये महापालिकेच्या शाळांचे केवळ 2 विद्यार्थी आहेत. महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढविणे, शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी अधिक संख्येने चमकावेत यासाठी विशेष उपक्रम सुरू करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या नव्या कारभार्‍यांनी याकडे गांभिर्याने पाहणे आवश्यक आहे.