Sat, May 30, 2020 02:06होमपेज › Sangli › सांगलीत मुसळधार पाऊस सुरू 

सांगलीत मुसळधार पाऊस सुरू 

Last Updated: Oct 10 2019 6:50PM
सांगली : प्रतिनिधी

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सांगलीत जोरदार पाऊस सुरू झाला आहे . जोरदार पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे .

यंदा पाऊस कमी प्रमाणात पडणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र ऑगस्टमध्ये कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे कृष्णा आणि कोयना नदीला मोठा महापूर आला. कृष्णा नदीची पाणीपातळी सांगलीत 57 फुटाच्या वर गेली होती. त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. कोट्यावधी रुपयांचे नुकसान या महापुरात झाले. त्यानंतर आता परतीचा मान्सून गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्याच्या पूर्व भागात बरसत आहे. 

हवामान खात्याने गुरुवार, शुक्रवार या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याप्रमाणे सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार सरी बरसत होत्या. महापुरामुळे अनेक तळ घरात, सखल भागात साचलेले पाणी अजून पूर्णपणे हटलेले नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून विविध आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. डेंगूच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याच वेळी आता पुन्हा जोरदार पाऊस आल्यामुळे नागरिक चिंतेत आहेत.