Tue, Sep 25, 2018 14:31होमपेज › Sangli › सांगलीसह जिल्ह्यात वादळी पाऊस 

सांगलीसह जिल्ह्यात वादळी पाऊस 

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 01 2018 11:08PMसांगली : प्रतिनिधी

दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर  शुक्रवारी सायंकाळी सांगली, मिरज शहरांसह पलूस, तासगाव, वाळवा  आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावांत वादळी वार्‍यासह पाऊस झाला. शहरात रात्री साडेसातच्या सुमारास सुमारे तासभर जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी-पाणी झाले होते. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. 

सकाळपासून हवेत उकाडा वाढला होता. त्यामुळे सायंकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार रात्री साडेसातनंतर पावसाला सुरुवात झाली. विजांचा चमचमाट आणि ढगांचा गडगडाट होत होता. सुमारे तासभर जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी- पाणी झाले होते. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले.  शहरातील मारुती रस्ता, स्टेशन चौक, झुलेलाल चौक, काँग्रेस कमिटी, राजवाडा परिसर, मार्केट यार्ड आदी ठिकाणी पावसाने तळे साचले होते. उपनगरांसह गुंठेवारीतही पावसाने दैना उडाली.

स्टेशन चौकात पाणी साचून तळे झाले. शिवाजी मंडई परिसरातही पाणी शिरल्याने विक्रेत्यांची  पळापळ झाली. बसस्थानक परिसर, झुलेलाल चौक, सिव्हील हॉस्पिटल चौक आदी भागातही पाणी साठले होते.वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. 

दरम्यान वाळवा, मिरज, पलूस शहर, तसेच कडेगाव  तालुक्यातील सोनहिरा खोरे, तासगाव आणि कवठेहाकांळ तालुक्याच्या काही भागात  पाऊस झाला. 
  भिलवडी परिसरात  पावसाने आज हजेरी लावली. वातावरण असे होते, की मोठा पाऊस पडेल असे वाटत होते. प्रत्यक्षात तुरळक सरी पडल्या अंकलखोप, माळवाडी व अन्य गावातही थोडा पाऊस झाला.