होमपेज › Sangli › सांगली शहरासह तासगाव, शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस

सांगली शहरासह तासगाव, शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 11:25PMसांगली, तासगाव, : प्रतिनिधी

शहरासह तासगाव, शिराळा तालुक्यात दुपारी जोरदार पाऊस झाला. तासगाव तालुक्यात घरांवरील पत्रे उडून गेले. शिराळा तालुक्यात झाड उन्मळून पडून नुकसान झाले.गेले दोन दिवस ठिकठिकाणी जोरदार पावसाची हजेरी सुरू आहे. गुरुवारी दुपारी सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात जोरदार पाऊस झाला. तासगाव शहरासह तालुक्यातील लिंब, पानमळेवाडी, येळावी, आरवडे हातनूर, डोर्ली, लोढे, पुणदी, विसापूर, हातनोली, धामणी, गोटेवाडी या गावांना गुरुवारी दुपारी पावसाचा तडाखा बसला. हातनोली येथील द्राक्षबागांचे नुकसान झाले. हातनूर, गोटेवाडी येथील घरांवरील पत्रे उडून गेली. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. 

शिराळा येथे वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. वार्‍यामुळे येथील बसस्थानकामधील निलगिरीचे मोठे झाड वादळाने मुख्य रस्त्यावर उन्मळून पडल्याने सर्व वाहतूक बाह्य वळण रस्त्यावरून चालू करण्यात आली. झाड पडल्याने निखिल निकम यांचे खोक्याचे सत्तर हजार रुपयांचे नुकसान, विद्युत खांब, डीपी, दूरध्वनी खांब पूर्ण वाकले असून विद्युत तारा तुटल्याने शहरातील वीज पुरवठा खंडित झाला 

आहे. तालुक्यातील बिळाशी, वीरवाडी, धसवाडी कुसाईवाडी, खुंदलापूर, मांगरूळ, मोरेवाडी, रिळे परिसरात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. वीजपुरवठा खंडीत झाला होता. बिळाशीत दत्तमंदिरावर झाड कोसळले मंदिराचे वीस हजाराचे नुकसान झाले.तर मधूकर रोकडे यांच्या शेडचे पत्रे उडून गेले. पवारवाडी-देवनगर येथील  अनेक घराचे छत उडून गेले आहेत. अनेक घराची कौले जनावरांचे छप्पर उडून गेली आहेत. तसेच देवनगर येथील मांगले-शिराळा मार्गालगतची लोखंडी स्वागत कमान वार्‍याने कोलमडली आहे. परिसरातील अनेक झाडांची पडझड झाली आहे. ऊस शेतीचे नुकसान झाले. 

भिंत कोसळून खटावमध्ये शेतकरी ठार

मिरज : शहर प्रतिनिधी 

तालुक्यातील खटाव येथे वादळी वार्‍याने घराची भिंत कोसळून शंकर तमन्‍ना शेंडूरे (वय 50, रा. खटाव) हे शेतकरी जागीच ठार झाले. गुरुवारी दुपारी  ही दुर्घटना घडली. शंकर व त्यांची दहा वर्षांची मुलगी असे दोघेजण घरात होते. वादळात त्यांच्या घराचे सर्व पत्रे उडून गेले. भिंत त्यांच्या डोक्यावर पडल्याने ते जागीच ठार झाले. घरात पलीकडच्या खोलीमध्ये त्यांची दहा वर्षांची मुलगी थांबली होती. घराचे पत्रे उडू लागल्याने ती घरातून बाहेर आली.