Thu, Feb 21, 2019 15:24होमपेज › Sangli › चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी

Published On: Aug 20 2018 1:39AM | Last Updated: Aug 20 2018 12:36AM
वारणावती : वार्ताहर 

चांदोली धरण परिसरात  पावसाची संततधार सुरुच आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या  24 तासात  70 मिलिमीटर पावसाने अतिवृष्टीची  नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातून विसर्ग वाढविला आहे. त्यामुळे  तालुक्यातील चार पुल पाण्याखाली गेले आहेत.  गेल्या चोवीस तासात 70 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून परिसरात पावसाची संततधार सुरुच आहे.

सातत्याने पर्जन्यवृष्टी सुरुच आहे. जलाशयात येणार्‍या पाण्याची आवक वाढल्याने धरणाच्या सांडव्याद्वारे दुसर्‍यांदा मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने शुक्रवारी दुपारी 12 वाजता धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु केला आहे. धरणातील पाण्याची आवक वाढल्याने  पुन्हा रविवारी सकाळी सांडव्याद्वारे 9 हजार 358 क्युसेक, विजनिर्मीती केंद्रातून 799 क्युसेक तर कालव्याद्वारे 470 क्युसेक असे एकूण 10 हजार 627 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. 

नदीकाठच्या गावांना धरण प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.  सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वारणा नदीला पुर आला आहे. शिराळा तालुक्यातील आरळा- शित्तुर, कोकरुड- रेठरे, काखे- मांगले, मांगले- सावर्डे असे चार पुल पाण्याखाली गेले आहेत. नदीकाठची भात, ऊस आदी पिके दुबारा पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. तर चरण, सोनवडे  येथील स्मशानशेडही पाण्याखाली गेले आहे. चांदोली  धरण पाणलोट क्षेत्रात  गेल्या  24  तासात 70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आजअखेर धरण क्षेत्रात 2 हजार 480 मिलीमीटर पावसाची नोंद वारणावती येथील  पर्जन्यमापन यंत्रावर झाली आहे. सध्या धरणात 33.20 टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. आजअखेरच्या पावसामुळे धरण 96.51 टक्के भरले आहे.