Mon, Aug 19, 2019 00:40होमपेज › Sangli › आटपाडीत गटशेतीचा प्रयोग आवश्यक

आटपाडीत गटशेतीचा प्रयोग आवश्यक

Published On: Mar 11 2018 1:09AM | Last Updated: Mar 10 2018 10:55PMआटपा़डी : प्रतिनिधी

तालुक्यातील जिद्दी आणि कष्टाळू शेतकर्‍यांनी गटशेतीच्या माध्यमातून विकासाला चालना द्यावी, असे प्रतिपादन कोल्हापूर कृषी विभागाचे सहसंचालक महावीर जेंगटे यांनी केले.येथील पंडितराव देशमुख यांच्या डाळिंब बागेत शेतकर्‍यांशी संवाद साधताना ते बोलत होते. सभापती हर्षवर्धन देशमुख, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, बंडोपंत देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, तालुका कृषी अधिकारी सुनील लोखंडे, बी.टी.पाटील, डी. एम. पाटील, आर. के.देशमुख उपस्थित होते.

जेंगटे म्हणाले, गटशेतीला मोठे अनुदान व शासनाचे सहकार्य लाभत आहे, त्याचा लाभ घ्या. छाटणीपासून डाळिंबाची काळजी घेतल्यास चांगले उत्पादन घेता येते. हंगामाच्या चौथ्या टप्प्यातील डाळिंबेही विकली गेली पाहिजेत. डाळिंब प्रक्रिया उद्योग सामुदायिक प्रयत्नातून उभारण्याची गरज आहे.ते म्हणाले, शासनामार्फत स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीतून हवामानाची  अचूक माहिती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पणन आणि विक्री व्यवस्था सुधारण्याचे काम सुरू आहे. तालुक्यात जलयुक्तशिवार असलेली गावे वाढविली पाहिजेत. गतिमान पाणलोट विकास योजनेच्या माध्यमातून ही गावे जलसमृध्द करता येतील.

हर्षवर्धन देशमुख म्हणाले, जलयुक्त गावांची संख्या वाढविण्यासाठी शासनाच्या विविध योजनांमध्ये तालुक्याला प्राधान्य द्यावे. बी. टी. पाटील यांनी डाळिंब पिकाचे राज्यपातळीवर नियोजन, हंगामाचे वेळापत्रक आणि निर्यात नियोजन करण्याची मागणी केली.डी. एम. पाटील यांनी बोगस औषध विक्रीवर नियंत्रण आणि  हवामान अंदाजासाठी यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त केली. भाऊसाहेब गायकवाड यांनी माती परीक्षण प्रयोगशाळा आटपाडीत सुरू करावी, अशी मागणी केली.   शेतीत प्रगत तंत्राचा वापर    आधुनिक शेतीसाठी प्रगत विज्ञान तंत्राचा अवलंब करतात.आपल्याकडेही हा प्रयोग सुरू आहे. युवा शेतकर्‍यांनी शेतीविषयक वाचन आणि अभ्यास करावा. आधुनिक तंत्राची माहिती घ्यावी आणि नियोजनबध्द शेती करावी, असा  सल्ला  जेंगटे यांनी दिला.