होमपेज › Sangli › सत्तेतील आमदारांकडूनच पालकमंत्री धारेवर

सत्तेतील आमदारांकडूनच पालकमंत्री धारेवर

Published On: Apr 08 2018 7:11PM | Last Updated: Apr 08 2018 6:58PM



सांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नवीन वीज कनेक्शन मिळत नाहीत. पाणी असतानाही पिके वाळत आहेत. त्यांनी काय आकडा टाकायचा काय? निकृष्ट बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍याला भरपाई कधी मिळणार? रिक्त जागा कधी भरल्या जाणार आदी प्रश्‍न विचारत पालकमंत्री सुभाष देशमुख यांना आज भाजप, शिवसेनेच्या आमदारांनीच धारेवर धरले. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप आढावा बैठक झाली. त्यात भाजपचे आमदार सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावर मंत्री देशमूख यांनी प्रश्‍न सोडवण्याबाबत अधिकार्‍यांना सुचना दिल्या. सरकारच्या पातळीवरही पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. 

 यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक महावीर जंगटे आदी उपस्थित होते.

आमदार बाबर यांनी सुरुवातीलाच निकृष्ट बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना १ कोटी ७० लाख कधी मिळणार अशी विचारणा करण्यात आली. ही कंपनी अद्यापही बियाणे विकत असल्याचे सांगितले. दहा-दहा मिनिटाला वीज जात आहे. फ्यूजा, ट्रान्सफॉर्म जळाल्यानंतर शेतकर्‍यांनाच पैसे गोळा करून भरावे लागत आहेत. महावितरणच्या अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे सांगितले. आमदार खाडे यांनी २०१३ पासून मागणी असलेल्या शेतकर्‍यांना अद्याप कनेक्शन मिळालेली नाहीत. इतर जिल्ह्यात मात्र २०१६ पर्यंत अर्ज केलेल्या कनेक्शन मिळालेली आहेत. शेतकर्‍यांनी आता काय तारेवर आकडा टाकायचा काय? महावितरणचे अधीक्षक अभियंत्यापासून विविध पदे रिक्त आहेत, ती कधी भरली जाणार असा सवालही त्‍यांनी उपस्‍थित केला. 

आमदार नाईक म्हणाले, शिराळा तालुक्यातील ३५ गावांना गावठाणमधून विद्यूत पंपाना वीज मिळत नाही. नवीन कनेक्शन मिळत नाही. लोकांनी पाण्यासाठी काय करायचे. जून महिन्यात वीज, बियाणे, खते हे प्रश्‍न गंभीर असणार आहेत. त्याबाबत आताच काळजी घ्यावी.

दरम्यान मंत्री देशमूख यांनी विविध प्रश्‍नासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसह कृषी विषयक विविध योजनांची शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी. ज्या भागात जी पिके पिकतात त्यानुसार खरेदी केंद्रे सुरू करावीत. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना मागणीप्रमाणे बियाणे, खतांचा, पुरवठा करावा. पीक कर्जाचे वितरण करावे.  शेतकर्‍यांची हेतुपुरस्पर अडवणूक आणि फसवणूक करणार्‍या निविष्ठा विक्रेत्यांची, कंपन्यांची गय करू नका, असाही  इशारा त्यांनी दिला. यावेळी खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी स्वागत केले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आले.