Thu, Jan 17, 2019 00:45होमपेज › Sangli › कर्जमाफीची ‘ग्रीनलिस्ट’ गुरूवारपर्यंत

कर्जमाफीची ‘ग्रीनलिस्ट’ गुरूवारपर्यंत

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 08 2018 11:20PMसांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत चार टप्प्यांनंतरची ‘ग्रीनलिस्ट’ (पात्र यादी) गुरूवारपर्यंत (दि. 15) प्रसिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिले. दरम्यान, जिल्ह्यातील 99 हजार शेतकर्‍यांचे या  यादीकडे लक्ष लागले आहे. त्यातील सुमारे 25 हजार शेतकरी पात्र ठरण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी चार टप्प्यात जिल्ह्यात 91 हजार 192 शेतकर्‍यांना लाभ मिळालेला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ‘ओटीएस’ साठी जिल्ह्यातून 1 लाख 83 हजार शेतकर्‍यांनी (कुटुंबे) ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी चार टप्प्यात 91 हजार 192 शेतकर्‍यांना 187 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. 

चार टप्प्यानंतर जिल्ह्यातील 21 हजार 324 शेतकर्‍यांची यलो लिस्ट त्रुटी दुरुस्तीसाठी जिल्हा बँकेकडे आली होती. त्यातील 1 हजार 861 पात्र ठरले, तर 19463 अपात्र ठरले. मात्र अधिकृतपणे पात्र-अपात्रता जाहीर झालेली नाही. ‘यलो लिस्ट’नंतर ‘मिसमॅच-1’ यादी आली. जिल्हा बँकेकडील 40 हजार 515 व राष्ट्रीयकृत बँकेकडील 16 हजार शेतकर्‍यांची यादी पडताळणीसाठी आली. ‘मिसमॅच-2’ यादीत जिल्हा बँकेकडील 20 हजार 842 व राष्ट्रीयकृत बँकेकडील 2 हजार शेतकर्‍यांचा समावेश आहे. ‘मिसमॅच-2’ मधील सुमारे 12 हजार शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

चार टप्प्यांनंतरची यलोलिस्ट, ‘मिसमॅच-1’ व ‘मिसमॅच-2’ मधील एकूण 99 हजार शेतकर्‍यांचे लक्ष कर्जमाफीसाठी अधिकृतपणे पात्र-अपात्र यादी जाहीर करण्याकडे लागले आहे. त्यातील सुमारे 25 हजार शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.