होमपेज › Sangli › द्राक्ष बागायतदारांचा औषध फवारणीचा धडाका

द्राक्ष बागायतदारांचा औषध फवारणीचा धडाका

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 8:57PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

जिल्ह्याच्या बहुतांश  भागात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊसही झाला. त्यामुळे द्राक्षबागा, भाजीपाला यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी औषध फवारणीचा धडाका लावला आहे. 

यावर्षी जिल्ह्यातील बहुतांश  भागात रब्बी पिके चांगली आहेत. पूर्वभागात समाधानकारक पाण्याची उपलब्धता असल्याने द्राक्षे, डाळिंब, भाजीपाल्याची पिके चांगली आहेत. मात्र यावर्षी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे शेतकर्‍यांसमोर सतत संकटे उभी रहात आहेत. 

पंधरा - वीस दिवसांतून ढगाळ वातावरण तयार होते. काही ठिकाणी अवकाळी पाऊसही झाला. त्याचा फटका द्राक्षे आणि भाजीपाला पिकाला बसला. आता ओखी वादळामुळे गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. मिरज आणि तासगाव तालुक्याच्या काही भागात सोमवारी सायंकाळी पाऊसही झाला. या वातावरणामुळे दावण्या आणि किडीचा धोका वाढणार आहे. तो टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी औषध फवारणी सुरू केली आहे.   

रोगाला थोपवण्यासाठी हजारो रुपये औषधांवर खर्च करावे लागत आहेत. आतापर्यंत अनेक शेतकर्‍यांच्या द्राक्षबागांत 25 ते 30 टक्के नुकसान झाले आहे. सध्याच्या वातावरणामुळे आणखी फटका बसण्याचा धोका आहे. सध्या अनेक   द्राक्षबागा फुलोर्‍यांत आहेत. मणीगळ आणि मणीकुज होत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आधीच औषध फवारणीचा धडाका लावला आहे. हरभरा, गहू या पिकांवर ही कीड वाढण्याची शक्यता आहे. रब्बी ज्वारीला हा पाऊस उपयुक्त आहे.