Sun, Nov 18, 2018 11:18होमपेज › Sangli › साहित्यातून शब्दांचे सोने : श्रीनिवास पाटील

साहित्यातून शब्दांचे सोने : श्रीनिवास पाटील

Published On: Jan 13 2018 1:14AM | Last Updated: Jan 12 2018 10:16PM

बुकमार्क करा
भिलवडी : प्रतिनिधी

शब्दांना स्पर्श करुन सोने करण्याचे काम साहित्य करते. हे काम अविरतपणे गेली 75 वर्षे कृष्णाकाठच्या औदुंबर तीर्थक्षेत्री होत असल्याचे  गौरवोद‍्गार सिक्‍कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले. 

औदुंबर येथील सदानंद साहित्य मंडळाच्या अमृतमहोत्सवी साहित्य संमेलानात ते बोलत होते. औदुंबर येथे 75 वे साहित्य संमेलनाचे उद्घाटन पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मिलिंद जोशी होते. पाटील म्हणाले, कृष्णाकाठी संस्काराचे बीज पेरण्याचे काम सदानंद साहित्य मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्‍या साहित्य संमेलनातून होत आहे. येथील मातीत बंड करण्याची ताकत आहे. चांगले फुलवून सांगण्याचे व वाईट लपवण्याचे काम साहित्य करते. समाजातील घातक गोष्टींवर साहित्यातून लिहिले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.  

संमेलनाध्यक्ष जोशी म्हणाले, नरेंद्रांना विवेकानंद करण्याचे काम ज्या साहित्याने केले ते साहित्य लोप पावत आहे.  आता टिकाऊपणापेक्षा दिखावूपणा वाढला आहे. राजकारण्यांचा साहित्याशी संबंध तुटला असून साहित्यात राजकारण घुसले ही खेदजनक बाब आहे.   खासदार संजय पाटील यांनी  औदुंबरचा विकास साधण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. यावेळी आमदार मोहनराव कदम, शहाजी सूर्यवंशी, श्रीनिवास कुलकर्णी, वासुदेव जोशी, केदार जोशी, समीर देशपांडे, सुभाष कवडे, गिरीश जोशी व मान्यवर उपस्थित होते.

चालू घडीला लेखणीला न्यूनगंड व भयगंडाने ग्रासले आहे. जाती व्यवस्थेने समाजाचे विघटन केले जात आहे. या व्यवस्थेला लेखणीने प्रश्‍न विचारण्याचे धाडस दाखवले पाहिजे. समाजातील विचारवंत याबाबत कोणती भूमिका घेतात, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. 
- प्रा. डॉ. मिलिंद जोशी