होमपेज › Sangli › मनपातील भ्रष्टाचाराबद्दल शासन निष्क्रीय

मनपातील भ्रष्टाचाराबद्दल शासन निष्क्रीय

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 29 2018 8:52PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी सुरू असून घोटाळेबाजांवर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जाहीर केले आहे. त्यांचे हे विधान नागरिकांची दिशाभूल करणारे  आहे,  अशी टीका नागरिक हक्क संघटनेचे कार्यवाह वि.द. बर्वे यांनी केली आहे.

ते म्हणाले, महापालिकेतील अनेक घोटाळ्यांची यापूर्वी चौकशी झाली आहे, विशेष लेखापरीक्षण झाले आहे. अनेक प्रकरणात न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले आहेत, मात्र  पूर्वीच्या काँग्रेस आघाडीच्या आणि विद्यमान भाजपच्या निष्क्रीय  सरकारने भ्रष्टाचाराबद्दल कोणताही कारवाई केलेली नाही. 

बर्वे म्हणाले, महापालिकेतील नोकरभरती, बीओटीची बांधकामे, रस्ते, ड्रेनेज योजना अहवाल, शेरीनाला योजना, विकास आराखडा तयार करायचे दिलेले कंत्राट, वसंतदादा शेतकरी बँकेतील ठेवी,  वारणा उद्भव पाणी योजना अशा अनेक प्रकरणांबद्दल नागरिक हक्क संघटना, मदनभाऊ युवा मंच आदी संघटनांनी आवाज उठवला. न्यायालयात किंवा शासनदरबारी तक्रारी केल्या. या सर्व प्रकरणांची चौकशी होऊन कारवाईचे आदेशही झाले आहेत. बीओटी प्रकरणात तर कठोर कारवाईचे आदेश झाले आहेत. मात्र शासनाने कोणताही कार्यवाही केलेली नाही.

ते म्हणाले, बीओटी तत्वावर झालेल्या बेकायदा बांधकामांवर कोणताही कारवाई झाली नाही. शेतकरी बँकेत महापालिकेचे  ठेवींचे पैसे अडकले. ते संबंधितांकडून वसूल करण्याचा आदेश झाला आहे. मात्र अद्यापि कोणतीही कारवाई केली नाही. शेतकरी बँकेतील महापालिकेचे स्वतःचे पैसे वसूल करण्यासाठीही कोणताही हालचाल झाली नाही. महापालिकेचे आत्तापर्यंत तीन ते चार वेळा विशेष लेखापरीक्षण झाले आहे. त्याचे अहवालही शासनाला सादर झाले आहेत. मात्र त्या अहवालातील निष्कर्ष किंवा ताशेर्‍यांची कोणतीही दखल शासनाने गांभिर्याने घेतलेली नाही.  

बर्वे म्हणाले, महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल असंख्य तक्रारी नगरविकास मंत्रालयाकडे करण्यात आलेल्या आहेत. मात्र तिथे एकाही प्रकरणावर गांभिर्याने कारवाई झाल्याचा अनुभव नाही. त्यामुळे यापुढेही शासन काही कारवाई करेल असे दिसत नाही. निदान भाजपच्या नेत्यांनी लोकांची दिशाभूल तरी करू नये, अशी आमची अपेक्षा आहे.  

Tags : sangli, Municipality,  corruption, governments, inaction,