Mon, Mar 18, 2019 19:20होमपेज › Sangli › चला उभारू प्लास्टिकमुक्‍तीची गुढी

चला उभारू प्लास्टिकमुक्‍तीची गुढी

Published On: Mar 18 2018 1:06AM | Last Updated: Mar 17 2018 10:28PMसांगली : अमृत चौगुले

कचर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणावर टाकले जाणारे प्लास्टिक ही कचरा उठावामधील सर्वात मोठी समस्या आहे. प्रदूषणाचेही कारण आहे. तसेच या प्लास्टिकमुळेच उघड्या आणि बंदिस्त गटारीही तुंबतात. पावसाळ्यात रस्तोरस्ती त्यामुळेच पाणी साठते. गुढी पाडव्याच्या निमित्ताने प्लास्टिक मुक्‍तीची गुढी उभारण्याची गरज आहे.

महापालिका क्षेत्रात रोज 200 टन कचरा गोळा होतो. त्यापैकी 20 टन कचरा हा प्लास्टिकचा असतो. जिल्ह्यात अशाच पद्धतीने हजारो टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होत आहे. राज्यभरात ही समस्या गंभीर बनली आहे. 

त्यामुळेच राज्यशासनाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्लास्टिक बंदी आदेश लागू केला. मात्र  त्याची आता अंमलबजावणीही सक्‍तीने होणे गरजेचे आहे. बंदी अंमलात आणतानाच रस्त्यावर, गटारात येणारा प्लास्टिकरूपी कचरा रोखण्याचे महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींसमोर आव्हान आहे.

सर्वाधिक प्लास्टिक पॅकिंगमध्ये

धान्य, भाजीपाल्यापासून ते सर्वच घरगुती वस्तूंच्या पॅकिंगसाठी गेल्या काही वर्षांत प्लास्टिक पिशव्या, बॉक्स सर्रास वापरल्या जातात. बाजारात जाताना पूर्वी प्रत्येकाकडे कापडी पिशव्या असत. आता कोणीही पिशवी घेऊन बाजारात जात नाही. त्यामुळे किळकोळ पासून घाऊक खरेदीपर्यंत सर्रास प्लास्टिकच्या कॅरीबॅग वापरल्या जातात. त्याची जणू आता प्रत्येकाला सवयच लागली आहे. 
यातील 90 टक्क्यांपेक्षा अधिक प्लास्टिक पिशव्या या कचरा म्हणून उकिरडा, गटारी आणि रस्त्यावर फेकल्या जातात. अतिपातळ पिशव्या किंवा अन्य वस्तूंचे रासायनिकदृष्ट्या  विघटन होत नाही. कचरा रस्त्यावर पडून दुर्गंधी निर्माण होते. प्लास्टिकचा वापर बंद करण्याबरोबरच लोकांनीही त्यासाठी स्वतः पुढे आले पाहिजे.

एकहजार डस्टपेक्षा भयावह प्रदूषण

कचर्‍यातील प्लास्टिकचा  इंधन किंवा रस्तेकामांसाठी पुनर्वापर वापर होऊ शकतो. पण त्याच्या ज्वलनातून अन्य पदार्थांपेक्षा अधिक घातक प्रदूषण  होते. ते तब्बल एक हजार डस्टपेक्षा अधिक असते. यामुळे श्‍वसनदोष, कर्करोग अशा गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे याचा वापर करणे धोकादायक आहे.

वैद्यकीय कचर्‍यात प्रमाण अधिक

वैद्यकीय क्षेत्रातील उपकरणे, साधने यासाठी प्लास्टिकचा सर्रास वापर होतो. त्यामध्ये इंजेक्शन सिरिंज,  सलाईन पाऊच, औषधांच्या बाटल्या, रक्‍ताच्या बाटल्या यासाठीही प्लास्टिकचाच सर्रास वापर होतो. तोही  वापरा आणि फेकून द्या, अशा स्वरुपाचाच आहे. तो कचराही सरळ उघड्यावर  फेकला जातो. वास्तविक हा कचरा वेगळा ठेवून तो कायमस्वरुपी नष्ट करून टाकावा, असा कायदा आहे. मात्र तसे क्वचितच होते.

निर्मिती बंदी; साठ्याचे काय?

शासनाने आता प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र तिचे नेमके स्वरुप संदिग्ध आहे. आता पाण्यापासून शीतपेयांपर्यंत अनेक वस्तूंसाठी प्लास्टिकचा वापर होतो. त्यामुळे कोणत्या वस्तूंवर बंदी घालणार, ते स्पष्ट झाले पाहिजे. तसेच यापूर्वी प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तू, पिशव्या या साठ्यांचे काय करायचे त्याचाही निर्णय जाहीर झाला पाहिजे. साठे तसेच राहिले तर प्लास्टिक बंदी कधीच अंमलात येणार नाही.

डिजिटलमध्येही प्लास्टिक

डिजिटल, होर्डिंग्जच्या विळख्यामुळे शहरात विद्रुपीकरण होते. तरीही मुख्य मार्ग आणि चौका-चौकात बंदी आदेश झुगारूनही फलक झळकत असतात. त्याचप्रमाणे डिजिटलच्या निर्मितीतील केमिकलमधूनही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. डिजिटलमधील प्लास्टिकही धोकादायक असते. त्यामुळे डिजिटलवर संपूर्ण बंदी आवश्यक आहे.

महापालिका, शासनाची भूमिका

यापूर्वी प्लास्टिक वापराबाबत भरपूर प्रबोधन झाले आहे. मोहिमाही राबवल्या गेल्या आहेत. तसेच बंदीच्या घोषणाही झाल्या आहेत. मात्र, प्लास्टिकचा भस्मासूर आकाराने वाढतच गेला आहे. शासनाच्या आता नव्या आदेशाची अंमलबजावणी कोण करणार ते स्पष्ट झाले पाहिजे. शहरी भागात महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायतींकडे अधिकार असणार का? अन्न व औषध प्रशासन, महसूल खाते यांच्याकडे जबाबदारी असणार का, ते स्पष्ट झाले पाहिजे. 

Tags : government, plastic ban, prescript, Gudi Padva, auspicious occasion,