Wed, May 22, 2019 14:19होमपेज › Sangli › दूध उत्पादकांना न्याय द्या : राष्ट्रवादीची मागणी

दूध उत्पादकांना न्याय द्या : राष्ट्रवादीची मागणी

Published On: Jul 18 2018 1:54AM | Last Updated: Jul 17 2018 11:40PMइस्लामपूर : शहर वार्ताहर

सरकारच्या दूध धोरणाबाबत शेतकरी संतप्‍त आहेत. कृषी राज्यमंत्री मुख्यमंत्र्यांना चुकीचा सल्‍ला देवून दिशाभूल करत आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राजारामबापू पाटील दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी केली. दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान  शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावे, या मागणीसाठी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्यावतीने प्रांत कार्यालयावर गायींसोबत येऊन मोर्चा काढला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार बिपीन लोकरे यांना देण्यात आले. 

येथील वाळवा पंचायत समिती परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक  घालून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चामध्ये सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अध्यक्ष पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दूध प्रश्‍नाबाबत आक्रमक आहेत. तालुक्यातील शेतकरी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. भाजप सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे.  सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा छायाताई पाटील म्हणाल्या, राज्य सरकार शेतकर्‍यांबाबत संवेदनशील नाही. हे राष्ट्रवादी कधीही सहन करणार नाही. भाजप सरकारला हिसका दाखवून देवू. 

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील म्हणाले, कृषी राज्यमंत्री तालुक्यात मिरविण्यापुरतेच दिसतात. शेतकर्‍यांबद्दल अपशब्द वापरतात. त्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. युवकचे तालुकाध्यक्ष संग्राम पाटील म्हणाले, दुधात पाणी आहे की सरकारच्या अंगात पाणी आहे. दूध उत्पादक शेतकरी पेटून उठला आहे. शेतकरी हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. यावेळी सुश्मिता जाधव यांचे भाषण झाले. मोर्चात सहभागी झालेल्या सर्वांना दूध वाटप करण्यात आले. दूध बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. 

प्रा. शामराव पाटील,माजी तालुकाध्यक्ष बी. के. पाटील, पं. स. उपसभापती नेताजीराव पाटील, उपसभापती सुरेश गावडे, दूध संघाचे माजी अध्यक्ष नेताजीराव पाटील, जि. प. सदस्य संजीव पाटील, माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, संचालक उदय पाटील, व्ही. एन. पाटील, पोपट जगताप, शशिकांत पाटील, माजी युवकाध्यक्ष संजय पाटील, कारखाना संचालक जे. वाय. पाटील, आनंदराव पाटील आदींसह  कार्यकर्ते, शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

त्यांचे फोटोसेशन तपासायला हवे...

आंदोलनातील दुधात पाणी असते, असे मंत्रीमहोदय म्हणत आहेत. त्यांचे सर्व उद्योग आम्हाला माहित आहेत. त्यांनी फोटोसेशन केलेल्या प्रतेक घटना या पुढे  तपासायला पाहिजे. त्यांना  जनता ओळखून आहे, असा टोलाही वक्त्यांनी लगावला.