Sat, Jul 20, 2019 09:10होमपेज › Sangli › ‘हात धुणारे’ नव्हे; शहर विकासाचे उमेदवार देऊ

‘हात धुणारे’ नव्हे; शहर विकासाचे उमेदवार देऊ

Published On: May 21 2018 1:04AM | Last Updated: May 20 2018 11:29PMसांगली : प्रतिनिधी

निवडून येऊन ‘हात धुणारे’ तेच ते चेहरे नव्हे तर जनतेला अपेक्षित असणारे शहराचा विकास करणारे नवे उमेदवार देऊ. त्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. श्री. पाटील यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभागनिहाय नागरी संवाद सुरू केला आहे. त्याअंतर्गत संजयनगर शिंदे मळा येथे बैठकीद्वारे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी श्री. पाटील यांच्यासमोर विद्यमान नगरसेवकांची कामाबद्दलची अनास्था आणि परिसराच्या दुरवस्थेचा पाढा वाचला. 

नागरिकांनी रखडलेल्या विश्रामबाग उड्डाणपुलामुळे होत असलेल्या त्रासाबद्दल गार्‍हाणे मांडले. गुंठेवारीत वर्षानुवर्षे सुविधा मिळत नाहीत. काही उपनगरांना तर मनपाने वाळीतच टाकले आहे. नगरसेवक पुलाच्या पलीकडे फिरकायला तयार नाहीत. असे सांगत ‘आम्ही भारतात राहतो की पाकिस्तानात’ असाही सवाल केला. मंगळवार बाजार चौकाकडून रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता नगरसेवकाने जाणीवपूर्वकस्टेटस्को निर्माण करून अडविल्याचा आरोपही काहींनी केला. बिनकामाचे नगरसेवक न देता अभ्यासू, जाण असणारे नगरसेवक द्या, असेही नागरिकांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, केंद्र व राज्यात सत्ता असल्याने सांगलीला चांगले करण्याची संधी भाजपला होती. पण ते केले नाही. आता कोणताही जनादार नसल्याने मंत्री भेटवस्तूंच्या रूपाने समोर येत आहेत. पण त्यांना त्यांची जागा दाखवा. 

यावेळी काँगेसच्या निष्क्रिय कारभारावरही श्री. पाटील यांनी ताशेरे ओढले. ते म्हणाले, महाआघाडीच्या काळात आम्ही शहराला चांगल्यात चांगल्या सुविधा देण्याचा पयत्न केला. त्यासाठी नवनवे प्रयोग, योजना राबविल्या. पहिल्या सहा महिन्यातच त्याची सुरुवात केली. घरकुल, वारणेऐवजी कृष्णेतून चांगले पाणी योजना, ड्रेनेज योजना, चांगली उद्याने देण्याचा प्रयत्न केला. वसंतदादा स्मारकाच्या काठावर 9 कोटी रुपये देऊन संरक्षक भिंत, कठडे बांधले. त्यावर आज लोकांना फिरण्याची सोय झाली आहे. वास्तविक 70 एमएलडी जलशुद्धिकरण योजना ही मागील टर्मच्या निवडणुकीपूर्वी 10-15 टक्के शिल्लक राहिली होती. ती काँग्रेस सत्तेत आता पूर्ण होत आहे. त्यासाठी त्यांना 5 वर्षे लागली. आता आमच्या योजनेवर त्यांचा उद्घाटनाचा फार्स सुरू आहे. 

पाटील म्हणाले, महाआघाडीच्या काळात सुरू असलेली सोडून गेल्या पाच वर्षांत एकही नवी योजना विकास झाला नाही. अर्थात महाआघाडीच्या काळात दोन वषार्र्ंत बिघाडी झाल्याने आम्हाला काही करता आले नाही. आता भाजप-काँग्रेसचा तुम्ही अनुभव घेतला आहे. शहराच्या विकासाची गती केवळ राष्ट्रवादीच देऊ शकतो. त्यासाठी जनतेतूनच चाचपणी सुरू आहे. समस्यांबरोबरच शहराच्या आवश्यक विकासाचा वचननामा आम्ही तयार करून जनतेसमोर येऊ. 

कार्यक्रमाचे संयोजन धनंजय पाटील यांनी केले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी महापौर सुरेश पाटील, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, महिला जिल्हाध्यक्षा विनया पाठक, नगरसेवक मनगू सरगर आदींसह महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरसेवकाचा जाहीर माफीनामा

गेल्या पाच वर्षांत कामे झाली नसल्याबद्दल जनतेतून खरडपट्टी होत असल्याचे लक्षात येताच नगरसेवक मनगू सरगर यांनी हात जोडून  जाहीर माफीनामा सुरू केला. ते म्हणाले, विरोधक म्हणून आम्ही कामासाठी प्रयत्न केला. परंतु केंद्र, राज्यात सत्ता नसल्याने नवी एकही योजना आली नाही. कामे अडवणुकीचाच उद्योग झाला. त्यामुळे मला माफ करा.