सांगली : प्रतिनिधी
सांगलीवाडीतील बायपास रस्ता परिसरातील एका पेट्रोल पंपासमोर राहणार्या, बारावीत शिकणार्या मुलीने पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. श्वेता सुरेश तावरे (वय 17) असे तिचे नाव आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. दरम्यान, तिने लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकूर संदिग्ध असून, त्यातून आत्महत्येचे कारण स्पष्ट होत नाही. शिवाय, तिच्या नातेवाइकांची कोणतीही तक्रार नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
श्वेता सांगलीतील एका महाविद्यालयात बारावीत शिकत होती. तिचे वडील हातकणंगले येथील एका पेट्रोल पंपावर काम करतात, तर आई शिक्षिका आहे. तिच्या मोठ्या भावाचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. रविवारी सकाळी वडील कामावर गेले होते. शाळेत कार्यक्रम असल्याने आईही घरी नव्हती. तिचा भाऊ कामासाठी सकाळी बाहेर पडला होता. अकराच्या सुमारास तो परत आल्यानंतर त्याला घराचा दरवाजा बंद दिसला.
त्यानंतर त्याने दाराच्या फटीतून पाहिल्यानंतर श्वेताने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत तातडीने सांगली शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर तिच्याजवळ एक चिठ्ठी सापडली. मला कोणताही मुलगा आवडत नाही. मला प्रेमात रस नाही. माझे कोणाशीही प्रेम प्रकरण नाही. मला शिकून मोठे व्हायचे आहे. माझ्या आत्महत्येप्रकरणी माझ्या कोणत्याही मित्रांना दोष देऊ नये. असा मजकूर त्या चिठ्ठीत लिहिला होता.
चिठ्ठीतील मजकूर संदिग्ध असून तिच्या नातेवाईकांची कोणाविरूद्ध तक्रार नाही, असे पोलिसांनी सांगितले. सायंकाळी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
शीर कापून घेतल्याच्या खुणा
दरम्यान तिच्या डाव्या हातावर करकटकने सचिन अशी अक्षरे कोरल्याचे दिसून आले. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी शीर कापून घेतल्याच्या खुणाही तिच्या हातावर दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले.