Wed, Mar 20, 2019 12:43होमपेज › Sangli › गळवेवाडीतील शाळकरी मुलीच्या खूनप्रकरणी गतीने तपास सुरू

गळवेवाडीतील शाळकरी मुलीच्या खूनप्रकरणी गतीने तपास सुरू

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 09 2018 11:31PM

बुकमार्क करा
सांगली/आटपाडी : प्रतिनिधी

गळवेवाडी (ता. आटपाडी) येथील शाळकरी मुलीचा खून गळा दाबून झाल्याचे उत्तरीय तपासणीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान शाळकरी मुलीच्या खुनामुळे आटपाडी तालुक्यात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीवर शारिरिक अत्याचार झाल्याचे अद्याप अहवालातून स्पष्ट झाले नाही. दोन दिवसांत त्याबाबत निष्कर्ष निघेल असे पोलिस सुत्रांनी सांगितले.     

गळवेवाडीतील प्रतीक्षा गळवेचा विहिरीत फेकलेला मृतदेह सोमवारी दिसून आला. अज्ञाताने तिच्याच पँटने तिचा आवळल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ती मूळची शिंगनहळळी  ( ता. जत) येथील आहे. गळवेवाडीत ती मामाकडे राहते. रविवारी सुटी असल्याने एकटीच घराबाहेर खेळत होती. त्यावेळी त्या वस्तीवर कोणीच नव्हते. तेव्हा अज्ञाताने तिचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सायंकाळी नातेवाईक घरी आल्यानंतर प्रतीक्षा न दिसल्याने तिचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली. मात्र ती सापडली नाही. 

सोमवारी सकाळी काळे वस्तीजवळच्या कोरड्या विहिरीत तिचा मृतदेह सापडला. तिच्या अंगावर जखमाही होत्या. मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. यामध्ये गळा आवळल्यानेच तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान याची गंभीर दखल घेत मंगळवारी पोलिस उपअधीक्षक अमरसिंह निंबाळकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक राजन माने यांच्यासह स्थानिक पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे. प्रतिक्षाच्या शेजारच्या लोकांकडे कसून चौकशी केली जात आहे. मात्र अद्यापही ठोस माहिती हाती लागली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

प्रतिक्षाला शेवटचे कोणी पाहिले, तिच्या बरोबर कोण होते का या दृष्टीने तपास केला जात आहे.ज्या विहीरीत प्रतिक्षाचा मृतदेह सापडला त्या परिसराचीही पाहणी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांची तीन पथके गतीने तपास करीत आहेत.