होमपेज › Sangli › बालिकेच्या  खुनाच्या तपासासाठी आटपाडीत नातेवाईकांचे उपोषण

बालिकेच्या  खुनाच्या तपासासाठी आटपाडीत नातेवाईकांचे उपोषण

Published On: Jan 17 2018 2:03AM | Last Updated: Jan 16 2018 11:37PM

बुकमार्क करा
आटपाडी ः प्रतिनिधी 

गळवेवाडी (ता.आटपाडी) येथील प्रतीक्षा दादासाहेब गळवे या शाळकरी मुलीच्या खुनाच्या तपासासाठी प्रतीक्षाच्या नातेवाईकांनी मंगळवारी उपोषण केले. वडील दादासाहेब, आई जयश्री, आजोबा जिजाबा गळवे,तसेच गळवेवाडी व सिंगणहळ्ळी ग्रामस्थांनी तहसील कार्यालय आणि पोलिस स्टेशनच्या दारात उपोषण केले.

प्रतीक्षा या चिमुकलीचा रविवारी खुन झाला. सोमवारी तिचा मृतदेह घराजवळच्या पडक्या विहिरीत आढळून आला. गेल्या आठ दिवसात पोलिसांना  एकही संशयित सापडला नाही. संतापलेल्या गळवे कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी मंगळवारी उपोषण सुरू केले.

खुनाच्या तपासासाठी पोलिसांनी गळवेवाडीला  तळ ठोकला आहे. पण आजअखेर पोलिसांना कोणताच सुगावा लागलेला नाही. त्यामुळे प्रतिक्षाचे नातलग  शरद काळेल, अर्जुन काळेल, राम हिप्परकर, नाना हिप्परकर, लोणारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष साहेबराव गळवे व ग्रामस्थांनी उपोषण सुरू करून तपास जलदगतीने व्हावा अशी मागणी केली.

पंचायत समिती सभापती हर्षवर्धन देशमुख, समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मोहनराव देशमुख, हणमंतराव देशमुख, राजेंद्र खरात, जयवंत सरगर, कल्लाप्पा कुटे, उमाजी ठोंबरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.    पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी तपासाबाबत न बोलता आठ दिवसात तपास पूर्ण करण्याची ग्वाही दिली. उपोषणकर्त्यांनी आठ दिवसात तपास न लागल्यास पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देत उपोषण स्थगित केले.