Wed, Nov 14, 2018 12:11होमपेज › Sangli › शिगाव येथे युवतीची आत्महत्या  

शिगाव येथे युवतीची आत्महत्या  

Published On: Jan 30 2018 1:54AM | Last Updated: Jan 29 2018 10:48PMआष्टा : प्रतिनिधी 

शिगाव (ता. वाळवा) येथे एका युवतीने दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. एका निनावी फोनमुळे सोमवारी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्या  युवतीचा  दफन  केलेला  मृतदेह  बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा केला. या घटनेने शिगावात खळबळ उडाली  आहे. 

याबाबत  आष्टा  पोलिस ठाणे  व घटनास्थळावरून मिळालेली  माहिती  अशी, या 19 वर्षीय  युवतीने  शनिवारी  (दि.27) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास   घरी  गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे  कारण समजू शकले नाही. या युवतीच्या कुटुंबीयांनी बदनामीच्या भीतीपोटी मृतदेह दफन केला.दरम्यान, अज्ञाताने आष्टा  पोलिसांना  या घटनेची माहिती दिली. 

याची माहिती मिळताच पोलिसांनी या घटनेची माहिती  वरिष्ठ पोलिस अधिकारी, तहसीलदारांना दिली. त्यानंतर  तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी व पंच घटनास्थळी गेले. दफन केलेला युवतीचा मृतदेह  बाहेर  काढून पंचनामा केला. मृतदेहाची  उत्तरीय तपासणी  आष्टा  ग्रामीण रुग्णालयात  करण्यात आली.  त्यानंतर  नातेवाईकांनी मृतदेह  ताब्यात घेऊन  दुसर्‍यांदा  दफन केले. पोलिसांनी  या सर्व  घटनेचे  व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. आष्टा  पोलिस  या प्रकरणाचा  अधिक  तपास करीत आहेत.