होमपेज › Sangli › आले गेले रशियाला तर भेंडी निघाली नेदरलँडला

आले गेले रशियाला तर भेंडी निघाली नेदरलँडला

Published On: Feb 24 2018 8:18PM | Last Updated: Feb 24 2018 8:18PMसांगलीः प्रतिनिधी

मिरज पूर्वभागातील काही प्रयोगशील शेतकर्‍यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘रयत फार्मर्स’ च्या माध्यमातून शेतकर्‍यांना भाजीपाला व शेतीउत्पादनाच्या बाजारपेठेसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.

दि. 18 ऑक्टोबर 2017 रोजी स्थापन करण्यात आलेल्या कृतिशील शेतकर्‍यांच्या या समूहाने आपल्या कार्याने समूहशेतीस प्रेरणा दिली आहे.  मिरज पूर्वभागात स्थापन झालेल्या व शेतीतील प्रयोगशील चळवळीने वडूज व खानापूर येथे शेतकर्‍यांनी पिकविलेले आले सातासमुद्रापार पोहोचले आहे. तर हेच आले आता जागेवर खरेदी करून ते रशियाला निर्यात करण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. 

खानापूर व वडूज भागात पन्नास मजूर लावून खोदाई, पॅकिंग करून 29 टन आले गोळा केले. यातून जवळपास 25 मे. टन आल्याचा कंटेनर रशियाला तीन महिन्यापूर्वी पाठविला. सुमारे 200 ग्रॅमची फनी तयार होईल असा दर्जा आल्यांचा तयार करण्यात आला होता. पूर्व भागातील या संस्थेचा हा पहिला प्रयोग आहे. या समूहात सहभागी  आले उत्पादकांना अपेक्षेपेक्षा चांगला दर मिळाला. 

दुसर्‍या टप्प्यात याच शेतकर्‍यांच्या युनिटने परभणी येथे जाऊन काही शेतकर्‍यांच्या भेटी घेतल्या. शेतकर्‍यांना भेंडी उत्पादनासाठी प्रेरणा दिली. तर त्या आधी नेदरलँड येथील प्रमुख निर्यातदार व्यापार्‍यांशी बैठक झाली आहे. किमान 23 ते 27 रुपये प्रतिकिलोचा दर देण्याचा शेतकर्‍यांना विश्‍वास दिला आहे. तेजी-मंदीचा विचार न करता स्थिर दर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर आठवड्याला चार ते पाच टन भेंडीच्या किमान उत्पादनाची हमी शेतकर्‍यांनी दिली आहे. किमान प्रतिकिलो भेंडीस 23 रूपये तसेच शक्य झाले तर 27 रूपये प्रतिकिलो दर देणार असल्याचेही सांगण्यात आले.

तिसर्‍या टप्प्यात मिरज पूर्वभाग व सांगली जिल्ह्यात 2350 रुपये प्रतिकिलो बाजारात भाव असलेल्या स्वीटकॉर्नच्या बियाणांचे आगाऊ रक्कम न घेता शेतकर्‍यांना काही कागदपत्रांची पूर्तता व पक्व स्वीटकॉर्न संस्थेस देण्याच्या हमीवर बियाणे वाटप करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. एकरी दोन किलो इतके हे बियाणे लागते. उत्पादित स्वीटकॉर्नकरीता 6000 रुपये प्रतिटन म्हणजेच 6 रुपये प्रतिकिलोचा कायमस्वरुपी स्थिर दर देण्याचे सांगण्यात आले. दरात जरी मंदी आली तरी आधी ठरलेल्या दराने माल खरेदी करण्याची लेखी हमी दिली जात आहे. या प्रक्रियेमुळे समूहशेतीस बळ मिळणे, तेजीमंदीचा फटका न बसणे, निर्यातीत चांगले दर मिळविण्याचा प्रयत्न करणे, भाजीपाल्याचे पीक समप्रमाणात व गावनिहाय करण्याबाबत जागृती करणे, दर घसरू नयेत याची काळजी घेणे असे प्रयत्न केले जात आहेत. ऐन हंगामात दरात अचानक होणार्‍या घसरणीच्या आपत्तीतून सावरण्यासाठी आधार देण्याचा हा  प्रयोग आहे.

भाजीपाल्यास चांगला दर मिळावा म्हणून समूहशेती व समूहाने विक्री करणे या प्रयोगामुळे नजीकच्या काळात शेतीला व्यापक व शाश्‍वत रूप देण्याचा प्रयत्न मिरज पूर्वभागातील या शेतकर्‍यांचा आहे. यासाठी पुण्यातील एका प्रोसेसिंग युनिटचे प्रमुख व रयत फार्मर्सचे मानद सचिव निवृत्ती गोदानी यांचे मार्गदर्शन मिळत आहे.  प्रयोगांना अध्यक्ष-अशोक विभुते, उपाध्यक्ष-सुरेश सोनंदकर, संचालक वसंत खोत, सोनी येथील राजू माळी, डोंगरवाडी येथील माजी कृषी सभापती दीपक शिंदे यांची साथ लाभत आहे.