Thu, Mar 21, 2019 15:27होमपेज › Sangli › सहकारमंत्र्यांना दुधाची बाटली भेट

सहकारमंत्र्यांना दुधाची बाटली भेट

Published On: Jan 02 2018 1:13AM | Last Updated: Jan 02 2018 12:09AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

राज्य सरकारने गाय तसेच म्हैस दूधात दर वाढ करुन देखील बहुसंख्य दुधसंस्था आणि दूधसंघ उत्पादकांना वाढीव दर देत नसल्याची टीका करीत शेतकरी संघटनेने आज सहकार मंत्री ना. सुभाष देशमुख यांना दुधाची बाटली भेट दिली. तसेच   सरकारने दूधउत्पादकांना वार्‍यावर सोडले असल्याचा आरोप केला.    

शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे राज्यध्यक्ष संजय कोले, सुनील फराटे यांच्याह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज ना. देशमुख यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भेटून दर वाढीची मागणी केली. तसेच याचवेळी मंत्री देशमुख यांना दुधाची बाटली भेट देण्यात आली. मंत्री देशमुख यांना सांगण्यात आले की, दूधदरवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अनेक दिवसांपासून मागणी केल्यानंतर राज्य सरकारने गाय आणि म्हैस दूधात प्रतिलिटर दर वाढीचा निर्णय जाहीर केला. सरकारने गाय दुधाला दोन रुपये तर म्हैस दुधाला प्रतिलिटर तीन रुपये दरवाढ देण्याचे आदेश दिले होते. 

या वाढीव दराचा लाभ उत्पादकांना कसाबसा महिनाभर मिळाला.  मात्र, पुढे वाढीव दर देता येत नसल्याचे सांगून राज्यातील सहकारी तसेच खासगी दुधसंघचालकांनी गाय दुधाचे प्रतिलिटर दर दोन ते तीन रुपयांनी कमी केले. त्यानंतर शेतकरी संघटनेने याबाबत दूधविकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे पाठपुरावा करुन कमी दर देणार्‍या दूधसंघचालकांवर कारवाई करण्यास भाग पाडले.  मात्र, नंतर सरकारने राज्यातील सहकारी दूधसंघ चालकांच्या दबावाला बळी पडून या कारवाईला देखील स्थगिती दिली. तसेच दूधदराबाबत निर्णय घेण्यासाठी समिती नेमून वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले. 

कोले म्हणाले, एकीकडे  दूधसंघचालकांनी खरेदीचे दर कमी केले, मात्र दुसरीकडे विक्रीचे दर मात्र कपात केलेली नाही. उत्पादकांकडून दूध खरेदी केल्यानंतर ग्राहकांपर्यत ते जाईपर्यंत वाहतूक, प्रक्रिया, पॅकींग, व्यवस्थापन खर्च हा सारा खर्च  साधारणपणे प्रतिलिटर दोन रुपयांच्या घरात जातो. 

मध्यस्थांचे कमिशन मिळून 8 ते 10 रुपये एकूण खर्च होतो.  हा आणि खरेदी मिळून प्रतिलिटरचा खर्च 28 ते 30 रुपये होतो. मात्र ग्राहकांना हेच दूध 40 ते 45 रुपये लिटरने विकले जाते. हे पाहता राज्य सरकारने उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांना वार्‍यावर सोडले असल्याचे स्पष्ट होते. या सार्‍या बाबींचा विचार करुन दूध संघ, संस्था आणि राज्य सरकारने या महत्वाच्या विषयांबाबत तातडीने निर्णय घेऊन गाय दुधाला प्रतिलिटर 27 रुपये दर द्यावा.  येत्या आठ दिवसात याची घोषणा करावी अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने याबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी रावसाहेब दळवी, शितल राजोबा,  आण्णा पाटील, रामचंद्र कणसे, मोहन परमणे, अल्लाउद्दीन जमादार, वसंत भिसे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.