Fri, Apr 26, 2019 04:09होमपेज › Sangli › करजगीत अडीच कोटींचा गांजा जप्‍त

करजगीत अडीच कोटींचा गांजा जप्‍त

Published On: Jun 04 2018 1:07AM | Last Updated: Jun 04 2018 12:18AMसांगली : प्रतिनिधी

जत तालुक्यातील करजगी येथे दीड एकरातील उसात लावलेली एक हजार तीनशे पन्नास किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. बाजारभावानुसार त्याची किंमत अडीच कोटी रुपये होत असल्याचे सांगण्यात आले. दैनिक ‘पुढारी’ने मेमध्ये ‘जत तालुका गांजा उत्पादनाचे आगर’ या मथळ्याखाली गांजा उत्पादनाचा पर्दाफाश केला होता. त्याची दखल घेत पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी गांजा उत्पादनावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी पोलिस उपअधीक्षक नागनाथ वाकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलिसांनी ही कारवाई केली. 

याप्रकरणी महेश ऊर्फ पिंटू मल्‍लाप्पा पट्टणशेट्टी व त्याचा भाऊ श्रीशैल मल्‍लाप्पा पट्टणशेट्टी (रा. करजगी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दोघेही पसार झाले असून, लवकरच त्यांना अटक करू, असे उपअधीक्षक वाकुडे यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले. 

उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करजगी या गावी गांजाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याची माहिती जतचे पोलिस उपअधीक्षक वाकुडे यांना मिळाली होती. त्यानुसार वाकुडे यांच्यासह उमदीचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांच्यासह पोलिस पथकाने रविवारी सकाळीच करजगीत छापा टाकला.

करजगी उमदीपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. करजगीमधील पट्टणशेट्टी यांच्या शेतात दीड एकर उसामध्ये गांजाची शेती केल्याचे आढळले. याप्रकरणी पोलिसांनी पट्टणशेट्टी बंधू यांच्यावर गुन्हा दाखल केला असून कारवाईची माहिती मिळताच दोघेही पसार  झाले आहेत.

करजगी गावापासून काही अंतरावर पट्टणशेट्टी यांचे शेत आहे. ऊसाच्या पीकात आंतरपीक म्हणून त्यांनी गांजाची झाडे लावली होती. दीड एकरातील गांजाची झाडे पाहून पोलिसांनाही आश्‍चर्याचा धक्‍का बसला. गांजाची पाच ते दहा फूट उंचीची झाडे असल्याने सकाळपासून गांजाची झाडे काढण्याचे काम सुरू होते. सर्व झाडे काढण्यातच पोलिसांचा अधिक वेळ गेला. त्याचा रितसर पंचनामा केल्यानंतर गांजाच्या झाडांनी एक ट्रॅक्टर पूर्णपणे भरला. कडब्याप्रमाणे गांजाची झाडे रचून ट्रॅक्टर उमदीत आणला. त्याचे वजन काट्यावर वजन केले. गांजाचे वजन 1 हजार 350 किलो भरले आहे. त्याची बाजारभावानुसार अडीच कोटी रूपये किंमत होत असल्याचे सांगण्यात आले. 

गांजाच्या शेतची माहिती उमदी पोलिस ठाण्याचे चालक सुधाकर पाटील यांनी दिली होती. या कारवाईत उपअधिक्षक वाकुडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे, उपनिरिक्षक सपांगे, हावालदार बामणे, कोळी, पाटील, पोलिस शिपाई आटपाडकर, सागर पाटील, दोन कामगार आदींनी सहभाग घेतला. श्रीशैल वळसंग यांनी उमदी पोलिसांत फिर्याद दिली आहे.