Mon, Jul 22, 2019 13:44होमपेज › Sangli › सांगली : दगडाने ठेचून गुंडाचा खून

सांगली : दगडाने ठेचून गुंडाचा खून

Published On: Jan 03 2018 1:17AM | Last Updated: Jan 02 2018 11:39PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

सांगली-कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणीजवळ एका गुंडाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. रमेश तम्मान्‍ना कोळी (वय 37, रा. हरिपूर) असे त्याचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. दारू पिताना एकमेकांकडे रागाने पाहण्यासह पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चौघा संशयितांना अटक केली आहे. 

रवी रमेश खत्री (वय 29, रा. सावंत प्लॉट, सांगली), जावेद जहाँगीर जमादार (वय 32, रा. फौजदार गल्ली, सांगली), सोमनाथ दादासाहेब डवरी (29, रा. बसस्थानकामागे, सांगली), अमीर ऊर्फ मिस्त्री मन्सूर नदाफ (30, रा. शांतीनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रमेशचा मित्र अजित आनंदराव पवार (रा. कुपवाड) याने सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

रमेश कोळी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास तो साथीदारांसमवेत हॉटेल वुडलँड येथे दारू पिण्यासाठी गेला होता. तेथून साडेबाराच्या सुमारास तो बाहेर पडला. त्यावेळी रस्त्याने रवी खत्री त्याच्या साथीदारांसमवेत जात होता. त्यावेळी त्यांच्यात एकमेकांकडे रागाने पाहण्यावरून बाचाबाची सुरू झाली. त्याचे रूपांतर वादात झाले.

त्यानंतर खत्रीसह त्याच्या साथीदारांनी रमेशला ढकलून खाली पाडले. तो खाली पडल्यानंतर चौघांनीही त्याचे डोके दगडाने ठेचले. तो मृत झाल्याची खात्री होईपर्यंत चौघेही त्याला दगडाने ठेचत होते. ही घटना पाहून रमेशचे साथीदार पळून गेले.  त्यांनी सांगली शहर पोलिस ठाणे गाठून घडलेली घटना सांगितली. 

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला माहिती मिळाली. पथकाने तातडीने त्यांचा शोध सुरू केला. पथकाने मिरजेत सापळा रचून चौघांनाही ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, अमित परीट, शशिकांत जाधव, किशोर काबुगडे, सचिन सूर्यवंशी आदिंच्या पथकाने चौघा संशयितांना पकडले. 

याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक रोहित चौधरी अधिक तपास करीत आहेत.