Tue, Jul 23, 2019 11:09होमपेज › Sangli › चार जिल्ह्यातून तिघांची टोळी हद्दपार

चार जिल्ह्यातून तिघांची टोळी हद्दपार

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 23 2018 10:46PMसांगली : प्रतिनिधी

कवठेमहांकाळ येथे खून, मटका, जुगार यासारखे पाच गंभीर गुन्हे दाखल असणार्‍या तिघांच्या टोळीला सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. टोळीप्रमुख रमेश खोतसह तिघांचा यामध्ये समावेश आहे. 

रमेश आप्पा खोत (वय 39, रा. कवठेमहांकाळ), विठ्ठल ऊर्फ शीतल भगवान खोत (वय 28, रा. विठुरायाचीवाडी), संग्राम विलासराव भोसले (वय 40, रा. रांजणी) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. टोळीप्रमुख रमेश खोतसह तिघांवरही खून, मटका, जुगार यांसारखे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांना विविध गुन्ह्यात वेळोवेळी अटक करण्यात आली होती. 

कवठेमहांकाळ शहरासह तालुक्यात त्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत होत्या. त्यांच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यासही घाबरत होते. या टोळीकडून कवठेमहांकाळ, पिंपळवाडी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यांच्याकडून कायदा, सुव्यवस्था बिघडून धोका होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या टोळीविरूध्द हद्दपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव अधीक्षक शर्मा यांच्याकडे सादर केला होता. सोमवारी अधीक्षक शर्मा यांनी तिघांनाही दोन वर्षांसाठी चार जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.  अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक राजन माने, उपनिरीक्षक जीवन राजगुरू, शशिकांत जाधव यांनी यासाठी काम पाहिले.