Fri, Apr 26, 2019 03:46होमपेज › Sangli › ‘मोफत सायकल वाटप’चा व्हायरल मेसेज बोगस!

‘मोफत सायकल वाटप’चा व्हायरल मेसेज बोगस!

Published On: Jul 22 2018 12:59AM | Last Updated: Jul 21 2018 11:43PMसांगली : प्रतिनिधी

‘फ्री साईकिल वितरण योजना भारत सरकार’ ही ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर व्हायरल झालेली योजना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमार्फत राबविली जात नाही. कोणत्याही शासकीय योजनेच्या नावाने वेबसाईटवर माहिती देताना/भरताना त्यात आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. 

‘फ्री साईकिल वितरण योजना भारत सरकार.. ! सभी लडके और लडकियों को मिलेगी मुफ्त मे साईकिल. सभी साईकिले 15 अगस्ट कोे बांटी जाएंगी, असा संदेश देत या एका वेबसाईटची लिंक मेसेज सोबत दिलेली आहे.’, हा मेसेज ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर व्हायरल झालेला आहे.

दरम्यान, या व्हायरल मेसेजमधील लिंकवर क्‍लीक करताच ‘प्रधानमंत्री साईकिल योजना 2018’ असे एक पेज ओपन होते. त्यामध्ये नाव नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज आहे. नाव, वडिलांचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, पत्ता आणि राज्याचे नाव याची माहिती भरल्यानंतर ‘रजिस्टर’ या बटनावर क्‍लिक केल्यावर व्हेरिफिकेशनसाठी हा मेसेज 10 मित्रांना शेअर करा, असा मेसेज येतो. एकूणच हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. हा व्हायरल मेसेज बोगस असण्याची शक्यता आहे.  त्यामुळे काही व्यक्ती जिल्हा परिषद, पंचायत समितीशी संपर्क साधून विचारणा करू लागले आहेत. 

त्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत म्हणाले, ‘फ्री साईकिल वितरण योजना भारत सरकार’ हा मेसेज सोशल मीडियवर व्हायरल होत आहेे. याविषयी अनेक लोक जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये विचारणा करत आहेत. अशी  योजना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमार्फत राबविली जात नाही. ग्रामविकास विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजना ‘डीबीटी’ पद्धतीने राबविल्या जातात. कुठेही वस्तूंचे असे  वाटप होत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मेसेजविषयी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये चौकशी करू नये. कुठल्याही शासकीय योजनेच्या नावाने वेब साईटवर माहिती देताना त्यात आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.