होमपेज › Sangli › पाणीपुरवठा साहित्य खरेदीत घोटाळा

पाणीपुरवठा साहित्य खरेदीत घोटाळा

Published On: Sep 05 2018 2:14AM | Last Updated: Sep 04 2018 11:00PM



इस्लामपूर : वार्ताहर
पाणीपुरवठा विभागात साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप सत्ताधारी गटाचे पक्षप्रतोद विक्रम पाटील यांनीच मंगळवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत  केला. त्याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. 

 शहरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारणे, प्रमुख मार्गावर रस्ता दुभाजक बसविणे व हायमास्ट पोल उभारणे असे ठराव  सभेत करण्यात आले.  सन 2017-18 च्या वार्षिक लेख्यास मंजुरी व विकासकामांच्या निविदा मंजूर करण्यावरून सत्ताधारी विरोधकांच्यात जोरदार चर्चा झाली. 

नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीत पालिकेची  सभा झाली. दलित महासंघाच्या  मागणीनुसार आंबेडकरनगर परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभा करण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. वार्षिक लेखा अहवालात अनेक त्रुटी असल्याचे राष्ट्रवादीचे गटनेेते संजय कोरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
पक्षप्रतोद  पाटील यांनीही सार्वजनिक नळ बसविणे व देखभाल दुरूस्ती खर्चात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला. पाणीपुरवठा विभाग व ठेकेदारात सेटलमेंट आहे. या विभागाने  केलेली साहित्य खरेदी व खर्चाची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

संजय कोरे, विश्‍वास डांगे, आनंदराव मलगुंडे यांनी सर्व प्रभागात समान निधी वाटप होत नाही तोपर्यंत  निविदा मंजुरीचा  विषय तहकूब ठेवण्याची मागणी केली. या विषयाला उपसुचना दिली. यावर विक्रम पाटील म्हणाले, मी डीपीडीसीतून विकासासाठी आणखी निधी मंजूर करून आणतो.ठरावाला मंजुरी द्या. त्यावर विरोधकांनी आधी निधी आणा, मग मंजुरी देतो, अशी भूमिका घेतली.  विक्रम पाटील म्हणाले, निधी आणला नाही, तर  मी राजीनामा देतो. 

कापूसखेड नाका ते नगरपरिषद हद्दीपर्यंतचा रस्ता पंचायत समितीकडून ताब्यात घेण्याच्या विषयाला खंडेराव जाधव यांनी विरोध केला. आधी पालिकेच्या ताब्यातील रस्ते दुरूस्त करा, मग तो रस्ता ताब्यात घ्या, अशी भूमिका त्यांनी मांडली. बाजारभाडे वसुली ठेका देण्याचा विषय रद्द करण्यात आला. उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी चर्चेत भाग घेतला.