होमपेज › Sangli › सांगलीत चार ट्रक प्लास्टिक जप्त

सांगलीत चार ट्रक प्लास्टिक जप्त

Published On: Jun 24 2018 1:35AM | Last Updated: Jun 23 2018 9:43PMसांगली ः प्रतिनिधी

प्लास्टिक बंदीच्या निर्णयानुसार आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांच्या आदेशाने महापालिका आरोग्य विभागाने सांगली, मिरज आणि कुपवामध्ये धडक कारवाई मोहीम सुरू केली. या अंतर्गत प्लास्टिक गोदामे, प्लास्टिक विक्री दुकानांसह बेकरी तसेच प्लास्टिकचा वापर करणार्‍या फर्मवर छापासत्र अवलंबले.  यात सांगलीत अकरा तर मिरजेत चार ठिकाणी छाप्यात प्लास्टिक पिशव्यांसह विविध प्रकारचा चार ट्रक साठा जप्त केला. व्यापार्‍यांकडून एक लाखांवर  रुपये दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम सलग पुढे सुरू राहणार असल्याचे खेबुडकर यांनी सांगितले. दरम्यान यामुळे प्लास्टिक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

कचर्‍यातील सर्वात मोठी समस्या ही प्लास्टिकची आहे.  नाल्यांसह नदी प्रदूषणातही प्लास्टिकचा मोठा वाटा आहे. यासाठीच राज्यशासनाने प्लास्टिकमुक्‍तीचा निर्णय घेतला आहे. व्यापार्‍यांच्या मागणीनुसार 23 जूनपर्यंत प्लास्टिक संपविण्यासाठी मुदत दिली होती. 

दरम्यान सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात तर अशा कचर्‍याचे हजारो टन ढीग साठून आहेत. प्लास्टिकसह विविध प्रकारच्या विघटित न होणार्‍या कचर्‍यामुळे शेतीसाठी खताचा वापरही थांबला आहे. याचा विचार करून राज्यशासनाच्या आदेशाने आज महापालिकेने प्लास्टिकजप्ती मोहीम सुरू केली. 

सांगलीत उपायुक्‍त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, स्वच्छता निरीक्षक वाय. एस. बारगीर, धनंजय कांबळे, ए. बी. सूर्यगंध, याकूब मद्रासी, डी. वाय. मंजळकर, राजू गोंधळे, श्री. साबळे यांच्या पथकाने  गणपती पेठ, मारुती रोड, हरभट रोडसह विविध ठिकाणी छपासत्र सुरू केले. यामध्ये प्रामुख्याने प्रथम प्लास्टिक वस्तूंची विक्री करणार्‍या दुकानांकडे मोर्चा वळविला.

बंदी असूनही काही  दुकानांमध्ये प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल प्लेट, चमचे, ग्लास, विविध प्रकारचे प्लास्टिक साहित्य, कंटेनर आदींचा मोठा साठा ठेवण्यात आल्याचे दिसून आले. वास्तविक महापालिका प्रशासनाने हे प्लास्टिक शनिवारपर्यंत पालिकेच्या सांगली, मिरज आणि कुपवाडमधील कार्यालयांमध्ये जमा करण्याचे आदेश दिले होते. तरीही अनेकांनी  साठा जमा केला नव्हता. त्यामुळे अशा दुकानांतील प्लास्टिक साहित्यांची पोती पथकाने जप्त केली. 

यामध्ये पंधरापेक्षा अधिक व्यापार्‍यांवर छापे टाकण्यात आले. त्यापैकी अकरा व्यापार्‍यांकडे प्लास्टिक साठा आढळून आला. त्यांच्याकडून  प्रत्येकी पाच हजार रुपयेप्रमाणे 55  हजारांचा दंड वसूल करण्यात आला. मिरजेतही उपायुक्‍त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त मेथे , आरोग्याधिकारी डॉ. सुनील ताटे, निरीक्षक दशवंत, कोथळे, कोलप, आठवले यांच्या नेतृत्वाखाली कारवाईमोहीम राबविण्यात आली. शहरात प्लास्टिक  पिशव्यांसह विविध साहित्य विकणार्‍या आठ व्यापार्‍यांवर छापा टाकून प्लास्टिकसाठा जप्त करण्यात आला.  त्यांच्याकडून प्रत्येकी  5 हजार अशा पद्धतीने 40 हजार रुपयांचा दंड वसूल  करण्यात आला. चार टन प्लास्टिक जप्त करण्यात आले.  दरम्यान, ही कारवाई पुढेही सुरूच ठेवणार असल्याचे श्री. खेबुडकर यांनी सांगितले. 

ते म्हणाले, सध्या मुख्य प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुढे मंगल कार्यालये, मटण-चिकन मार्केट, भाजीसह विविध प्रकारच्या मंडई, बाजार तसेच विक्रेत्यांकडेही कारवाईचा मोर्चा वळविणार आहोत.