होमपेज › Sangli › साडेचार लाखांची वाटमारी

साडेचार लाखांची वाटमारी

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 23 2018 11:38PMजयसिंगपूर/शिरोळ : प्रतिनिधी

जयसिंगपूर शहरालगत असलेल्या चौंडेश्‍वरी-शिरोळ आणि तमदलगे-जैनापूर या दोन बायपास मार्गांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर वाटमारीत सुमारे 4 लाख 66 हजार रुपये मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला. यामध्ये 95 हजार 700 रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. एका ठिकाणी चाकू, चॉपर, कोयत्याचा धाक दाखविण्यात आला. तर दुसर्‍या घटनेत बेदम मारहाण करून लुटण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर-चौंडेश्‍वरीमार्गे शिरोळ बायपास रोडवर शहरातील नांदणी नाक्याजवळ वरद हॉटेलजवळ संभाजीपूर (ता. शिरोळ) येथे एका पायलटला, तर तमदलगे खिंड ते जैनापूर हद्दीत बायपास मार्गावर वामन धाब्याजवळ एका बिल्डरला लूटण्यात आले. याप्रकरणी अनुक्रमे विजय आप्पासाहेब खोत (सध्या रा. बंगळूर, मूळ रा. संभाजीपूर) यांनी शिरोळ पोलिसांत, तर सोमनाथ रामचंद्र झुंगर्टे (वय 36, रा. वासूद रोड, गणेश अपार्टमेंट, सांगोला) यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

विजय आप्पासाहेब खोत हे बंगळूर येथे पायलट आहेत. ते बंगळूरहून पुण्याला आले. जयसिंगपूरला रात्री दीडच्या सुमारास आले. त्यांना आणण्यासाठी भाचा स्वनज हा मोपेडवरून गेला होता. संभाजीपूरकडे परत येत असताना पाठीमागून मोटारसायकलवरून तिघे जण आले. त्यांनी गाडी आडवी मारून दोघांना कोयता, चॉपर हत्याराचा धाक दाखवून खोत यांच्याकडील चार तोळे सोन्याच्या चार अंगठ्या, 15 हजारांची रोकड, लाखाचा अ‍ॅपल आयपॅड, 15 हजार रुपयांचा मोबाईल, 25 हजार रुपयांचा गॉगल, अन्य कागदपत्रे असा सुमारे 2 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन तिघे पसार झाले. मध्यरात्रीनंतर पावणेदोन वाजता ही घटना घडली.

जैनापूरजवळ लुटीची दुसरी घटना घडली. सोमनाथ रामचंद्र झुंगर्टे हे बांधकाम ठेकेदार आहेत. ते कामानिमित्त फोंडा येथे गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र चिंतामणी फोफळे व शाम पडवळे असे दोघे होते. तिघे रात्री 9 वा.च्या सुमारास कोल्हापुरात आले. जेवण करून ते सांगोल्याला बिटस् मोटार कारने (एम.एच. 6 एडब्ल्यू 7916) जात होते.

जैनापूरजवळ वामन धाब्याजवळ आल्यानंतर त्यांची कार बंद पडली. झुंगर्टे हे गाडीतून उतरून बॉनेट उघडून पाहत होते. रेडिएटरमधील पाणी संपल्याने फोफळे यांनी वामन धाब्यातून पाणी आणले. पडवळे हे गाडीत झोपले होते. यावेळी दोन मोटारसायकलवरून 25 ते 28 वयोगटातील एकूण सहाजण आले.

विचारपूस करीत दोघांनी झुंगर्टे यांना जमिनीवर पाडले. लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. एकजण त्यांच्या छातीवर बसला. दोघांनी फोफळेला पकडले. तर गाडीतील पडवळे यांना धमकी दिली. झुंगर्टे यांच्या गळ्यातील 2.5 तोळ्याची चेन, प्रत्येकी एक तोळ्याच्या दोन अंगठ्या व 80,700 रुपयांची रोकड, सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल असा सुमारे 2 लाख 11 हजारांचा ऐवज घेऊन लुटारूंनी पोबारा केला. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही लूटमार घडली. जयसिंगपूर व शिरोळ पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक  पूनम माने व पूनम रुग्गे या तपास करीत आहेत.

इचलकरंजी एलसीबी पथक दाखल

जैनापूर हद्दीतील घटना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास, तर नांदणी नाक्यावरील वर्दळीच्या ठिकाणची घटना दीड ते पावणेदोनच्या सुमारास घडली. शहरातील धरणगुत्ती रस्त्यावर असलेल्या ईदगाह परिसरात जॅकेट, पॅनकार्ड व अन्य साहित्य सकाळी  पोलिसांना आढळले आहे. ते खोत यांचे असावे, अशी माहिती पोलिसांनी दिली. इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने दिवसभर जयसिंगपूर परिसरात ठाण मांडले होते. सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम, पोलिस कर्मचारी फिरोज बेग, राजू पट्टणकुडे, सागर पाटील यांनी तपास केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.