Mon, Apr 22, 2019 05:43होमपेज › Sangli › परदेशात जाणार्‍यांना यापुढे सक्तीचे प्रशिक्षण : ज्ञानेश्वर मुळे

परदेशात जाणार्‍यांना यापुढे सक्तीचे प्रशिक्षण : ज्ञानेश्वर मुळे

Published On: Jan 16 2018 7:02PM | Last Updated: Jan 16 2018 7:02PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी 

मोठ्या पगाराच्या नोकरीचे अमिष दाखवून बोगस एजंटाकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी संबंधीत दोषीवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.  त्या शिवाय परदेशात  जाणार्‍यांना त्या ठिकाणी होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, भारताचे परराष्ट्र मंत्रालय पासपोर्ट, व्हिसा आणि विदेशातील भारतीयांच्या अडचणी आदी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करते आहे. सध्या ३ कोटी ११ लाख भारतीय परदेशात आहेत. कोणताही भारतीय नागरिक परदेशात अडचणीत असेल, तर त्यांना भारतात आणण्याची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालय घेते. त्याच्या राहण्याची, प्रवासाचीही व्यवस्था करते. गेल्या काही वर्षात अडचणीत असलेल्या 90 हजार लोकांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. बोगस एजंटावर कारवाईसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. परदेशात जाताना त्या ठिकाणच्या भारतीय दूतावासाचा संपर्क क्रमांक, पत्ता तुमच्याकडे असायलाच हवा. ई मायग्रेट प्रोटलवर नोंदणीकृत एजट, बोगस एजंट, विदेशात असलेल्या नोकरदारांची यादी  दिेलेली आहे. परदेशात जाणार्‍यांची माहिती दररोज या पोर्टलवर दिलेली असते. अधिकृत एजंटाकडून जे परदेशात जातात त्यांच्यासाठी प्रवाशी भारतीय विमा योजना आहे. दहा लाखापर्यंतचा  हा विमा आहे. परदेशात गेलेल्यांच्या येथील मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना आहे. 

ते म्हणाले, दिल्लीत असलेल्या सर्व मराठी अधिकार्‍यांचा एक मंच स्थापन केला आहे. प्रत्येक महिन्याला याची बैठक होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आदी या मंच्यावर येऊन गेले आहेत. महाराष्ट्राचा प्रभाव आणि प्रतिभा देशपातळीवर वाढावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या मंचच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे प्रकल्प आहेत, ते पूर्ण व्हावेत, यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील खासदारांच्यासाठी खासदार मित्र योजना राबवली जात असून एका खासदाराला एक मराठी अधिकारी जोडून देण्यात आला आहे. खासदार दत्तक गाव योजने प्रमाणे अधिकार्‍यांसाठी आदर्श ग्राम योजना सुरू केली आहे.