Sun, Jul 12, 2020 21:33होमपेज › Sangli › पाच अट्टल चोरट्यांना अटक

पाच अट्टल चोरट्यांना अटक

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 19 2018 10:54PMसांगली : प्रतिनिधी

विटा शहर आणि परिसरात घरफोड्या करणार्‍या पाच अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांनी विटा, वासुंबे, देवनगरमध्ये घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. विट्यात शनिवारी दुपारी पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, या चोरट्यांचे अन्य दोन साथीदार असून ते पसार झाल्याचे सांगण्यात आले. 

अजय राजेंद्र बसागरे (वय 19), बलराज अमर कातारी (वय 19), सागर अरविंद पवार (वय 22), प्रशांत प्रकाश बिराजदार (वय 21, चौघेही रा. साळसिंगे रस्ता, विटा), संतोष गुंडाप्पा हेगडे (वय 21, रा. महात्मा गांधी शाळेजवळ, विटा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. श्रीकांत बालाजी गुगलवाड, अभिजित वसंत ठोंबरे हे त्यांचे साथीदार पसार झाले आहेत. 

विट्यातील सराफ पेठ परिसरात दोन मोटारसायकलवरून पाचजण संशयास्पदरित्या फिरताना पथकाला दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेण्यात आली. त्यावेळी अजय बसागरे याच्याकडील पिशवीत सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू आढळून आल्या. बलराज कातारी, सागर पवार याच्याकडे प्रत्येकी एक महागडा मोबाईल सापडला. त्यांनी विटा, वासुंबे, देवनगर येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली.  त्यांचे दोन साथीदार पसार झाल्याचेही त्यांनी सांगितले. 

त्यांच्याकडून दागिने, दोन मोबाईल, दोन मोटारसायकल असा 1 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.