होमपेज › Sangli › उष्माघाताचा पहिला बळी

उष्माघाताचा पहिला बळी

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 12:17AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील पत्रकारनगरमध्ये शंभर फुटी रस्त्यावरील एका वाहनाच्या शोरूमसमोर उन्हाच्या तडाख्याने एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

प्रतिभा उल्हास धनवडे (वय 61, रा. अरिहंत कॉलनी, पत्रकार नगर, सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या गेल्या आठ वर्षांपासून जावई दीपक निकम यांच्याकडे राहत होत्या. तर त्यांचा मुलगा कळे (जि. कोल्हापूर) येथे राहतो. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास त्या भाजी आणण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी बाराच्या सुमारास त्या परतत असताना शंभर फुटी रस्त्यावरील एका वाहनाच्या शोरूमसमोर आल्यानंतर त्यांना चक्कर आली. त्यामुळे भोवळ येऊन त्या खाली पडल्या. 

बराचवेळ त्या अवस्थेत तेथेच पडून होत्या. त्यानंतर नागरिकांनी त्यांना सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. उत्तरीय तपासणीचा अहवाल रात्री उशिरापर्यंत आलेला नव्हता. त्यामुळे त्यांचा नेमका मृत्यू कशाने झाला, याचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान त्यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. 

जिल्ह्यात एप्रिलमध्ये चाळीस अंशाच्या वर उन्हाचा पारा गेला आहे. दुपारी बारानंतर रस्ते अक्षरशः ओस पडत आहेत. उष्माघातानेच प्रतिभा धनवडे यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उष्माघाताचा हा जिल्ह्यातील पहिला बळी ठरला आहे. 

Tags : sangli, heat stroke, first victim, sangli news,