Wed, Apr 24, 2019 16:02होमपेज › Sangli › तासगाव हाणामारी; तपास सीआयडीकडे

तासगाव हाणामारी; तपास सीआयडीकडे

Published On: Apr 27 2018 1:08AM | Last Updated: Apr 27 2018 12:24AMतासगाव : शहर प्रतिनिधी

तासगाव नगरपालिका प्रभाग क्रमांक 6 च्या पोटनिवडणुकीच्या प्रचारावरून राष्ट्रवादी आणि भाजप समर्थकांत झालेल्या हाणामारीचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागा (सीआयडी) कडे वर्ग करण्यात आला आहे.  ही माहिती पोलिस उपअधीक्षक अशोक बनकर यांनी दिली. 

दोन्ही पक्षांच्या समर्थकांत झालेली हाणामारी, भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसांना झालेली मारहाण, दाखल असलेल्या तीनही गुन्ह्यांचा तपास आता सीआयडी करणार आहे. त्यामुळे आता या सर्वच प्रकरणाचा फेरतपास होणार आहे. 

येथील नगरपालिका प्रभाग क्र. सहाची पोटनिवडणूक दि. 6 एप्रीलरोजी झाली. या निवडणुकीसाठी प्रचार सुरू असताना दि. 2 रोजी प्रचाराच्या कारणावरुन भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला होता.तलवारी, रिव्हॉल्व्हर, काठ्या, गज यांचा वापर करण्यात आला होता.  राष्ट्रवादीचे नगरसेवक तानाजी पवार यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती.   एका पोलिस अधिकार्‍यासह पाच पोलिस मारहाणीत गंभीर जखमी झाले होते.

याप्रकरणी पोलिस, राष्ट्रवादी व भाजप या तिघांकडून पोलिसांत नगरसेवक बाबासाहेब पाटील, अनिल कुत्ते, अ‍ॅड. बाळासाहेब गुजर या तीन नगरसेवकांसह एकूण 140 जणांवर फिर्यादी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानुसार या सर्वांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. पोलिसांनी व राष्ट्रवादीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये चौघांना तर भाजपने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये दोघांना अटक करण्यात आली होती.  अन्य 134 जण अद्यापही फरारीच आहेत.