Fri, Apr 26, 2019 10:00होमपेज › Sangli › दूध दरासाठी आज चक्‍काजाम

दूध दरासाठी आज चक्‍काजाम

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 19 2018 12:12AMसांगली : प्रतिनिधी

दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले बंद आंदोलन बुधवारी म्हणजे तिसर्‍या दिवशीही  सुरूच होते. अनेक ठिकाणी दुधाची टंचाई निर्माण झाली आहे. मोठे नुकसान होऊ लागल्याने काही ठिकाणी पोलिस बंदोबस्तात संकलन करण्याचा प्रयत्न संघांनी सुरू केला आहे. त्यामुळे संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी संतापले आहेत. अनेक ठिकाणी पोलिस व कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. सरकार व दूधसम्राटांविरोधात गुरुवारी (दि. 19) जिल्ह्याभर चक्‍काजाम आंदोलन करणार आहे. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. 

संघटनेने सोमवारी सुरू केलेले दूध बंद आंदोलन बुधवारी तिसर्‍या दिवशीही सुरू होते. शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यात शेतकर्‍यांनी दूध डेअर्‍यांना घालणे टाळले. काही संघांच्या गाड्या दूध गोळा करण्यासाठी  आल्या होत्या. त्या उत्पादकांनी परत पाठविल्या. अनेकांनी पिकांना दूध घालणे पसंत केले.  आंदोलनाने भिलवडी परिसरातील दूध संकलनावर फारसा परिणाम झालेला नाही. पोलिस बंदोबस्तात संकलन केलेेले  दूध  पुणे व मुुंबईकडे रवाना केले  जात आहे. पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी कार्यकर्ते व पोलिसांत वादावादी झाली.मिरज, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ  या तालुक्यांतही कडकडीत बंद पाळला. प्रमुख गावांतील कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी चौकात जमून दूध संकलन करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. 

कवठेमहांकाळ तालुक्यातील एका संघाच्या फॅक्टरीत घुसून कार्यकर्त्यांनी प्रक्रिया करणारे दूध ओतून टाकले. तहसीलदार कार्यालयासमोरील रस्त्यावर दूध वाहतूक करणारी वाहने अडवून दूध रस्त्यावर ओतले. नगरपंचायतीसमोर दुधाचे लोट वाहताना दिसत होते. अलकूडला एका खासगी डेअरीचे संकलन बंद पाडून कॅन फेकून दिले. म्हैसाळ येथे शिरगावे डेअरीचा टँकर  शेतकर्‍यांनी अडवून दूध ओतून टाकले. सांगलीतील शिरगावे डेअरी फोडून दुधाचे कॅन रस्त्यावर फेकून दिले. एका डेअरीत जाऊन संकलन बंद ठेवा, अन्यथा तोडफोड करू, असा इशारा दिला.खानापूर-विटा, आटपाडी, जत या तालुक्यात शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त बंद ठेवला. अनेक गावांतील हजारो लिटर दूध संकलन होऊ शकले नाही. काहींनी दूध शाळांत व गरीबांना वाटले.  काहींनी द्राक्ष व डाळिंब बागांवर ते फवारले. 

कोणी दूध संकलन करुन शहरात पाठविण्याचा प्रयत्न केल्यास टँकर, गाड्या पेटविण्याचा इशारा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांनी राज्यभर चक्काजाम जाहीर केला आहे. त्यानुसार  कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यात चक्का जाम करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, उपाध्यक्ष महावीर पाटील, संजय बेले, जयकुमार कोले, भागवत जाधव, सयाजी मोरे, राम पाटील, विकास देशमुख, संदीप राजोबा, भारत साजणे, सनी गडगे, दशरथ पाटील, संदीप चौगुले यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची आज सांगलीत बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग यासह  गावा-गावात चक्का जाम करण्यात येणार आहे. सरकारने सहनशीलतेचा अंत बघितल्याने शेतकर्‍यांची या आरपारच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.