Wed, May 22, 2019 10:15होमपेज › Sangli › आटपाडीत सरपंचपदासाठी काटा लढत

आटपाडीत सरपंचपदासाठी काटा लढत

Published On: May 26 2018 12:51AM | Last Updated: May 25 2018 8:02PMआटपाडी : प्रतिनिधी

आटपाडी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी भाजप आणि शिवसेनेत काटा लढत होत आहे. उमेदवारी अर्ज माघारीदरम्यान झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजप आणि शिवसेनेत होत असलेली  थेट सरपंचपदाची लढत आता  दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.  भाजपकडून मनीषा आबासाहेब नांगरे-पाटील आणि शिवसेनेकडून वृषाली धनंजय पाटील यांच्यात थेट सामना होते आहे. नगरपंचायत होणार असल्याने आटपाडी ग्रामपंचायतीची निवडणूक  होणार नाही, अशी शक्यता होती. अर्ज भरण्याच्या केवळ तीन दिवस आधी निवडणूक आयोगाने हे निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेने उमेदवारी अर्ज भरले. स्वाभिमानी विकास आघाडीने मात्र उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत.

आटपाडी ग्रामपंचायतीचे  राजकारण माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, स्वाभिमानी विकास आघाडीचे भारत पाटील आणि तानाजी पाटील या तिघांच्या भोवतीच फिरत राहते. नेत्यांच्या आधारावर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यातील दोन गट एकत्र येतात किंवा स्वतंत्र लढतात.  दोन गट मिळून सत्ता स्थापन करतात. मात्र यावेळी चित्र वेगळे आहे.   स्वाभिमानी आघाडीने या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचे ठरवले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत थेट लढत होत आहे. अर्ज माघारी घेण्याच्या नाट्यमय घडामोडी नंतर भाजपचे तब्बल 15 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग चार आणि एकमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी लढत होत आहे.

माजी आमदार देशमुख, अमरसिंह देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ही लढत प्रतिष्ठेची केली आहे.थेट सरपंचपदासाठीचे दोन्ही उमेदवार मराठा समाजातील आहेत. या मातब्बर उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. प्रभाग चार आणि पाच हा देशमुख गटाचा बालेकिल्ला आहे. या दोन प्रभागातील बहुमत निकालात महत्वपूर्ण ठरणार आहे. भाजपचा उमेदवार प्रभाग एक तर शिवसेनेचा उमेदवार दोनमधून उभा आहे. या दोन्ही उमेदवारांचा आपापल्या प्रभागातून  मोठी आघाडी देण्याचा प्रयत्न राहणार आहे.

पंधरा उमेदवार निवडून आल्याने भाजपने सरपंचपदाची निवडणूक  देखील जिंकत ग्रामपंचायत भाजपमय करण्याचा तर सरपंचपदाची एकमेव जागा बळकावत भाजपवर कुरघोडी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.त्यामुळे सरपंचपदाची निवडणूक भाजप-सेनेसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. सरपंचपदाची ही शेवटची लढत आहे. यानंतर नगरपंचायत किंवा नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा निकाल भाजप आणि शिवसेनेत कोण बलवान हे ठराणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.