Tue, Jul 23, 2019 02:27होमपेज › Sangli › शिक्षक बँकेच्या सभेत तुफान हाणामारी 

शिक्षक बँकेच्या सभेत तुफान हाणामारी 

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 09 2018 11:24PMसांगली : वार्ताहर 

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत प्रचंड हाणामारी झाली. एका सभासदाने  संचालकाला चोपल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे सत्ताधारी गटाने पाचच मिनिटांत सभा गुंडाळली. दोन मिनिटांत 12 विषय मंजूर करण्यात आले. सभा झाली असल्याचा व झाली नसल्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आला. त्यानंतर विरोधी गटाकडून समांतर सभा होऊन सर्व विषय नामंजूर झाल्याचा दावा करण्यात आला.

शिक्षक बँकेची सभा येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सकाळी दहा वाजता सुरू होणार होती. साडेनऊ वाजल्यापासून सत्ताधारी गटाचे सभासद सभागृहात जमू लागले. पहिल्या काही रांगेतील खुर्च्यांवर ते बसले. सत्ताधारी  गटाचे नेते व त्यांचे समर्थक व्यासपीठाकडे जाणार्‍या रस्त्यावरच खुर्च्या टाकून बसले. त्यामुळे विरोधकांना प्रश्‍न विचारण्यासाठी ध्वनिक्षेपकापर्यंत जाणे शक्य नव्हते. सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी त्या खुर्च्यां बाजूला घेऊन रस्ता मोकळा करण्याची मागणी केली. सत्ताधारी नेत्यांनी ती मागणी फेटाळल्याने गोंधळाला सुरुवात झाली.

बँकेचे अध्यक्ष रमेश पाटील हे अध्यक्षस्थानी होते. विषयपत्रिकेवरील विषय क्रमांक नऊवरील इमारत व जागा खरेदीबाबतच्या विषयावर मतदान  घेण्याची मागणी व्यासपीठावर बसलेले विरोधी गटाचे संचालक विनायक शिंदे यांनी अध्यक्षांकडे केली. यावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यामुळे सभागृहातील विरोधक आणखी संतप्त झाले व सर्वजण व्यासपीठाच्या दिशेने जाऊ लागले.

या गोंधळात एका सभासदाने व्यासपीठावर जाऊन संचालक शशिकांत बजबळे यांना खाली पाडून मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत दोघे व्यासपीठावरील टेबलाखाली जावून एकमेकांला मारहाण करू लागले. त्यावेळी व्यासपीठावरील संचालकांनी दोघांना एकमेकांपासून बाजूला केले. याच दरम्यान सभागृहातील सत्ताधारी व विरोधक व्यासपीठावर आले. सत्ताधारी समर्थकांनी त्या मारहाण करण्याची धुलाई सुरू केली. विरोधी गटाच्या सभासदांनी त्याची सुटका केली. काही वेळाने जखमी अवस्थेत तो तिथून निघून गेला.

या गोंधळातच सत्ताधारी गटाने सभेचे कामकाज सुरू केले. दोन मिनिटात 12 विषय मंजूर करण्यात आले व  राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. त्याच दरम्यान सभागृहात सत्ताधारी व विरोधी समर्थक सभासद मोठ मोठ्याने मंजूर, नामंजूरच्या घोषणा देत होते. राष्ट्रगीत झाल्यावर सभागृहातील वीज, बंद करण्यात आली व त्यानंतर व्यासपीठावरील सत्ताधारी संचालक सभागृहातून निघून गेले.

सभागृहाबाहेर आल्यावर दोन्ही गट एकमेकांच्या संघटनांच्या निषेधाच्या घोषणा देत होते. बाहेर आल्यावर विनायक शिंदे, अविनाश गुरव, महादेव हेगडे व विरोधी संचालकांनी समांतर सभा घेतली व विषयी पत्रिकेतील सर्व विषय नामंजूर केल्याचे जाहीर केले. ही आजची सभा नियमाप्रमाणे पार पडली असून विरोधकांनी नैराश्येतून सभेत गोंधळ केला असल्याचा आरोप अध्यक्ष रमेश पाटील यांनी केला. तर ही सभा झालीच नसल्याने त्याबाबत जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती विरोधी गटाचे संचालक शिंदे  यांनी दिली.